
निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या माजी आमदाराचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यामुळे नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली आहे.
मूळ काँग्रेसकडून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या मुरकुटे यांनी २०१४ च्या विधानसभेपूर्वी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. त्या निवडणुकीत त्यांनी तालुक्याचे प्रभावी नेते शंकरराव गडाख यांचा अनपेक्षित पराभव केला. मात्र २०१९ मध्ये गडाख यांनी पंचवीस हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवत मुरकुटेंचा पराभव केला. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली; पण शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी गडाख आणि मुरकुटे या दोघांनाही पराभूत केले.
Ahilyanagar News: “समितीचा अहवाल आल्यानंतर…” कृषिमंत्र्यांचे कर्जमाफीबाबत महत्वाचे विधान
बंडखोरीनंतर भाजपाने त्यांना निलंबित केले. पुन्हा पक्षात प्रवेश होणार असल्याच्या चर्चा असल्या तरी स्थानिक पातळीवर ते सक्रिय झाले नव्हते. आ. विठ्ठलराव लंघे तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचे असले तरी पूर्वी ते भाजप जिल्हाध्यक्ष होते; त्यामुळे तालुक्यात दोन्ही पक्षांवर त्यांची मजबूत पकड आहे. अशा परिस्थितीत मुरकुटे यांच्या महत्त्वाकांक्षांना भाजपात फारशी जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी महायुतीतीलच पण पर्यायी घटक पक्ष, म्हणजे राष्ट्रवादी (अजित पवार गट) निवडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी महायुती सत्ता आहे. मुरकुटे यांना थेट भाजप किंवा शिवसेनेसोबत जाणे मान्य नसले तरी सत्तेच्या राजकीय फायद्यापासून दूर राहायचे नाही, या हिशोबाने त्यांनी राष्ट्रवादीची निवड केल्याचे मानले जाते. हा विकास भाजप आणि शिवसेनेसमोर अतिरिक्त डोकेदुखी निर्माण करणारा ठरू शकतो.
पुणे, मुंबईतील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा अन्…; हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
मुरकुटे यांच्या प्रवेशानंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. नेवासे येथे बाबा कांगुणे, प्रतिक शेजूळ, किरण दारुंटे, नितीन कडू, गोकुळ डौले आदींसह त्यांनी खोलेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर राजमुद्रा चौक ते डॉ. आंबेडकर चौक अशी मिरवणूक काढण्यात आली. भेडे, कुकाणे आणि देवगाव येथेही समर्थकांनी मिरवणुका काढून आनंद साजरा केला.