"समितीचा अहवाल आल्यानंतर..." कृषिमंत्र्यांचे कर्जमाफीबाबत महत्वाचे विधान
अहिल्यानगर मधील कोपरगाव परिसरात कधी दुष्काळ, कधी गारपीट तर कधी बाजारभाव पडण्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर राहते. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक भूमिका घेत आहेत. समितीचा अहवाल एप्रिलमध्ये आल्यानंतर सहकारी बँकांचे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी, म्हणजे जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होईल, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केला.
कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १३व्या पुण्यस्मरणानिमित्त कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथे कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना आणि मित्रमंडळातर्फे आयोजित ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’चे उद्घाटन मंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते.
मंत्री भरणे म्हणाले की, अधिक उत्पादनासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचा न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आमदार आशुतोष काळे म्हणाले की बारामती, मोशी आणि नाशिक येथे होत असलेल्या मोठ्या कृषी प्रदर्शने सर्व शेतकऱ्यांना पाहणे शक्य नसते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीवरून ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’ आयोजित केला आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस शेती, दुग्धव्यवसाय आणि इतर कृषी क्षेत्रात वाढवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
BJP New President News: भाजपला कधी मिळणार राष्ट्रीय अध्यक्ष? राजनाथ सिंहांनी स्पष्टच सांगितलं
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानडे, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, कारभारी आगवन, प्रवीण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याचे मंत्री भरणे यांनी गौरविले. पुढील वर्षी अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत कृषी प्रदर्शन कोपरगाव येथेच होईल, अशी घोषणा त्यांनी केली.
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देऊन सहकार्य करत असल्याचे आ. काळे म्हणाले. दुग्धव्यवसायाकडे वळलेल्या शेतकऱ्यांसाठी तालुक्यात स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच सकारात्मक बातमी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
२०१९ मध्ये निवडून आल्यानंतर मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणता आला. यामागे कृषिमंत्री भरणे यांची प्रेरणा असल्याचे आ. कालेंनी नमूद केले. राज्यात सर्वाधिक सव्वासहा हजार कोटींचा निधी आणण्याचा विक्रम भरणे यांनी केला असून त्यांचाच आदर्श आपण घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






