
अहिल्यानगर शहरातील स्वच्छतेमध्ये सातत्य राहण्यासाठी येथील महानगरपालिकेने दिवसातून दोन वेळा साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून शहरात दैनंदिन साफसफाईचे काम सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात केले जाणार आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. मात्र यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता असून, हा निर्णय मागे घेण्यासाठी ते मनपा कर्मचारी पदाधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे समजते.
आमदार संग्राम जगताप यांनी मध्यंतरी शहरातील स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. दररोज सकाळी एका भागात ते अचानक भेट देऊन तेथील पाहणी करत होते. स्वतः झाडू घेऊन मोहिमेत सहभागी होत होते. प्रमुख चौकांतील स्वच्छता, रस्ता दुभाजकांना रंगरंगोटी आदी उपक्रम त्यांनी त्यावेळी करून घेतले होते. प्रोफेसर कॉलनी चौकात या सुविधा देतानाच तेथे कचरा होण्यास कारणीभूत ठरत असलेले रस्त्यावरील भाजीविक्रेते हटविण्यात आले होते. कालांतराने हे भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर आले असून, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या या चौकाची अवस्था पुन्हा एकदा केवीलवाणी होऊ लागली आहे. दरम्यान, आयुक्त डांगे यांनी नव्याने झालेल्या प्रभाग रचनेनुसार स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यानंतर संपूर्ण शहरात स्वच्छतेबाबत प्रभावी उपाययोजना करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
सद्यस्थितीत शहरातील दैनंदिन साफसफाईचे कामकाज केवळ सकाळीच होते. मात्र, आता सकाळी ६ ते १० आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ या दोन सत्रांमध्ये साफसफाई, झाडलोट केली जाणार आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी
करून स्वच्छता राखण्यासाठी मनपाच्या सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक आणि सहाय्यक स्वच्छता निरीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेचे युनियनचे पदाधिकारी असलेले अनेक जण महापालिका कर्मचारी पतसंस्थेचे पदाधिकारी आहेत. पतसंस्था ताब्यात ठेवण्यासाठी या पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. या पतसंस्थेसाठी सर्वाधिक मतदार स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यामुळे दोन सत्रातील स्वच्छतेचा विषय आल्यानंतर कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी होते. पतसंस्थेचे मतदार नाराज होऊ नये म्हणून वाट्टेल ते करण्याची तयारी असलेले पदाधिकारी दोन सत्रातील स्वच्छतेच्या मुद्यावर तोंड पाडून बसतात.
Maharashtra Rain Alert: तीन दिवस छत्र्या घेऊनच फिरा; राज्यातील ‘या’ भागात पाऊस झोडपणार
आजही स्वच्छता कर्मचाऱ्यांना दोन सत्रात स्वच्छता करणे मान्य नाही. सकाळी एकदा स्वच्छता केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच स्वच्छता करण्याच्या मानसिकतेत असतात. दोन सत्रातील स्वच्छतेचा विषय आल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. त्यांचा मनपा पदाधिकाऱ्यांवर दबाव वाढण्यास सुरुवात होते.
शहरात दोन वेळा स्वच्छता करण्याचा निर्णय यापूर्वीही एकदा घेण्यात आला होता. काही दिवस त्याची अंमलबजावणीही झाली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांनी यास विरोध केला. त्याला साथ देत युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे दोन वेळा स्वच्छता करणे बंद झाले.