
Ahilyangar News: जिल्ह्यात माविआचा घोळ अजूनही मिटला नाही
अहिल्यानगरमधील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर होऊन चार दिवस उलटले, तर दोन दिवसांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये उमेदवार तर ठरलेले नाहीतच, पण एकत्र लढायचे की स्वतंत्रपणे, यावरही अद्याप निर्णय झालेला नाही. स्वबळाचा नारा दिला जात असताना नेतेमंडळी मित्रपक्षांसोबत बैठकाही घेत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून ‘सब गोलमाल है’ अशी अवस्था आहे.
नगर जिल्ह्यातील १२ नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये यंदा निवडणुका होणार आहेत. अनेक ठिकाणी प्रथमच नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड होणार असून काही ठिकाणी ही संधी अनेक वर्षांनी मिळत आहे. दोन्ही गटांमध्ये तीव्र रस्सीखेच असल्याने नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित करताना सावध पावले उचलली जात आहेत. बंडखोरीच्या संकेतांमुळे राज्यस्तरावरून समन्वयाची प्रयत्न पुढील आठवड्यात सुरू होतील, अशी माहिती आहे. श्रीरामपूर, श्रीगोंदे आणि पाथर्डी येथे महायुती किंवा महाविकास आघाडी कितपत टिकेल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
श्रीरामपूरात भाजपाचे माजी नेते प्रकाश चिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना नगराध्यक्षपदासाठी पुढे केले जात असल्याचे बोलले जात असले तरी अंतर्गत स्पर्धा तीव्र आहे. चिते यांनी प्रवेशानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खुलेपणाने टीका सुरू केली असून महायुतीची शक्यता अत्यंत क्षीण झाल्याचे बोलले जाते. श्रीगोंद्यात पाचपुते विरोधक नेते एकाच पक्षात (अजित पवार गट) जमा झाले आहेत. मात्र या गटातही एकमत नाही. पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांना भाजपातील आणि मित्रपक्षातील विरोध कायम असून महायुतीला येथेही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
अलीकडील विधानसभा पराभवानंतर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात अत्यंत सावधपणे धोरण आखत आहेत. त्यांच्या समर्थकांमध्येही पराभवाचा बदला घेण्याची भावना तीव्र आहे. दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांना मंत्री विखे पाटलांचा मजबूत पाठींबा असून ते देखील सज्ज आहेत. त्यामुळे संगमनेर नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
कोपरगाव हे मोठे नगरपालिका क्षेत्र असून येथे आमदार आशुतोष काळे (राष्ट्रवादी) विरुद्ध माजी आ. स्नेहलता कोल्हे (भाजपा) असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीची ताटातूट जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान, भाजपाचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे पुन्हा सक्रिय झाले असून ते कोल्हे विरोधी गटातील मानले जातात. कोल्हे स्वतःचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी देण्यावर ठाम राहतील, त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे पुन्हा भाजपात बंडखोरी उद्भवेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.