ओ चौबे, हे बरोबर नाही, मूर्खासारखं...; वाहतूक कोंडीवरुन अजित पवार पोलीस आयुक्तांवर भडकले
पिंपरी : पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र आणि महामार्गावरील भीषण वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) सकाळी सहा वाजता चाकण चौक व चाकण परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. पुणे-नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर या दोन मुख्य महामार्गांवरील दररोजच्या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अजित पवारांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला. पाहणीदरम्यान त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांना कडक शब्दांत फटकारले आणि वाहतूक तात्काळ सुरळीत करण्याचे आदेश दिले. “ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीये? सगळी वाहतूक सुरू करा!” असे म्हणत अजित पवारांनी पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
या दौऱ्यात एनएचआय, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, महापालिका, रस्ते विकास महामंडळ यांच्यासोबत बैठक घेत विविध ठिकाणच्या वाहतूक कोंडीचा आढावा घेतला. पवारांनी मोशी, आळंदी फाटा, गवतेवस्ती, चाकण चौक आणि आंबेठाण चौक येथे पाहणी केली. वाहनांच्या वाढत्या प्रमाणामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर उपाययोजना सुचवताना त्यांनी रस्त्यांच्या नकाशांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
चाकण एमआयडीसीत सुमारे १५०० लघु-मध्यम उद्योग कार्यरत असून, साडेतीन लाखांहून अधिक कामगार दररोज येथे ये-जा करतात. यामुळे दररोज लाखो वाहनांची कोंडी या रस्त्यांवर होते. त्यातच चाकण-शिक्रापूर मार्गावरून जेएनपीटीकडे जाणारी अवजड वाहतूक आणि चुकीची रचना हे मोठे अडथळे बनले आहेत.
अजित पवारांनी यावेळी सांगितले की, तळेगाव ते शिक्रापूर मार्ग लवकरच सहापदरी करण्यात येणार आहे आणि पुणे-नाशिक मार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. मात्र, एलिव्हेटेड प्रकल्पांना अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याची खंत एनएचआयच्या अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी अजित पवारांनी चाकण परिसराला स्वतंत्र महापालिकेचा दर्जा देण्याचे संकेत दिले. “चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावीच लागणार आहे. काहींना हे आवडेल न आवडेल, पण हे होणारच.” असे स्पष्ट करत त्यांनी पुणे जिल्ह्यात नव्या तीन महापालिका स्थापन होण्याचे संकेत दिले. “तुम्ही खूप त्रास सहन केला. आता यातून सुटका हवी.” असंही अजित पवार म्हणाले. चाकण, महाळुंगे, हिंजवडी आणि औद्योगिक भागासाठी स्वतंत्र महापालिका आवश्यक असल्याचे पवारांनी नमूद केले.
वाहतूक कोंडीविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, “मी सकाळी ५:४५ वाजता आलो. एक गाडी थांबते आणि मागे रांगा लागतात. मग पीक अवर्समध्ये काय अवस्था होत असेल, याची कल्पना करा.” यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो दाखवत रस्ते सुधारण्याचेही निर्देश दिले.