लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळेच राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मुलगा पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सुनेत्रा यांचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे 2019 च्या निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. या राज्यसभेचा कार्यकाळ 4 जुलै 2028 पर्यंत असेल.
या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबातील एका सदस्याचं राज्यसभेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते नक्की पार्थ पवार यांना संधी देतात की सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी दिला राजीनामा
केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता. पटेल यांनी ज्या राज्यसभेचा राजीनामा दिला होता. त्या जागेच्या कार्यकाळात चार वर्षे शिल्लक होती. निवडणूक आयोगाने (ECI) फेब्रुवारीमध्ये पटेल यांनी रिक्त केलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक जाहीर केली. नवीन राज्यसभा खासदाराची निवड राज्यातील आमदारांद्वारे केली जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांचे दोन सत्ताधारी मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना यांच्या मदतीने जागा जिंकण्याची सर्व शक्ती आहे. राज्यसभेच्या जागेसाठी 25 जून रोजी मतदान होणार आहे. पवार कुटुंबाशिवाय तिसरे नाव आहे ते छगन भुजबळांचे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर अजित पवार सुनेत्रा पवार यांना दिल्लीला पाठवू शकतात.
राष्ट्रवादीची ताकद किती?
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा सध्या लोकसभेत एकच खासदार आहे. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे विजयी झाले आहेत. प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे एकमेव खासदार आहेत. याशिवाय महाराष्ट्रात पक्षाचे ४० आमदार आहेत. महाराष्ट्रात विधानपरिषद सदस्यांची संख्या 6 आहे. नुकत्याच पार पडलेल्या अरुणाचल प्रदेश निवडणुकीत 3 आमदार विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस मानली होती. यानंतर त्यांना पक्षाचे चिन्ह, घड्याळ वापरण्यासही परवानगी देण्यात आली.