
अकोल्यात एसटीच्या UPI तिकीटाला प्रवाशांची पसंती; 18917 प्रवाशांनी केला यूपीआयचा वापर
यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याने या व्यवहारात पारदर्शकता वाढली आहे. तसेच वाहक व प्रवाशांच्या वादावादीच्या प्रसंगांनाही ब्रेक लागताना दिसून येत आहे. यामध्ये फोन पे, गुगल पे व भीम अॅप तसेच तत्सम यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ झाल्याचेच चित्र अकोला जिल्ह्यामध्ये दिसत आहे. मागील दोन महिन्यात म्हणजे मार्च ते एप्रिल दरम्यानच्या आकडेवारीनुसार, एसटी महामंडळामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने यूपीआय व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसून आले.
ST Bus Employee : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार ! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर
दरम्यान, एसटी महामंडळाची ओळख निर्माण करणारी लालपरी ते शिवशाही आणि आताची आधुनिक पर्यावरण पूरक ई-ग्रीन बससेवा असा एसटीने वातानुकूलित व आरामदायी बससेवेपर्यंत भरारी घेतली आहे. एसटीच्या या सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहेत. सध्याचा ई-बससेवा प्रवाशांचे खास आकर्षण ठरत आहेत. या सेवेत सर्वाधिक यूपीआय व डिजीटल आणि ऑनलाइन तिकीट सेवेला प्रतिसाद मिळत आहे.
सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता
सप्टेंबरमध्ये एकूण सुमारे १८ हजार ९१७ प्रवाशांनी यूपीआयच्या माध्यमातून तिकीट काढले. या अंतर्गत अकोला डेपो क्रमांक १ मध्ये १ लाख ८९ हजार २५५ रुपये महसूल गोळा झाल्याची माहिती अकोला एसटी महामंडळाकडून देण्यात आली. आगामी एप्रिल व मे महिन्यात उन्हाळी सुट्यामुळे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे यूपीआय व्यवहारांमधून लाखोंचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत झाली वाढ
गेल्यावर्षी एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी १४ हजार १२३ प्रवाशांनी यूपीआयव्दारे पेमेंट करून प्रवास केला आहे. त्यातुलनेत यंदा ४ हजार ७९४ प्रवाशांची वाढ झाली असून, १८ हजार ९१७ प्रवाशांनी यूपीआयचा वापर केला असल्याची माहिती अकोला विभागाकडून देण्यात आली आहे.
यूपीआयद्वारे तिकीट काढण्याला चांगला प्रतिसाद
यूपीआयद्वारे तिकीट काढण्याच्या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुट्ट्या पैशांची अडचण दूर होण्यासोबतच तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली आहे. डिजिटल पेमेंटमुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून, रोख रक्कम जवळ नसतानाही तिकीट काढणे शक्य होत आहे. अधिकाधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
– स्मिता सुतवणे, विभागीय नियंत्रक, अकोला.
1. एसटी प्रवासात कोणत्या डिजिटल सुविधेला प्रवाशांची पसंती मिळत आहे?
एसटी तिकीटासाठी यूपीआयद्वारे पेमेंट करण्याच्या सुविधेला प्रवाशांची पसंती मिळत आहे.
2. यूपीआय तिकीटामुळे कोणता फायदा झाला आहे?
तिकिटासाठी सुटे पैसे देण्यावरून प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाद कमी झाले आहेत.
3. कोणत्या डेपोत यूपीआय तिकीटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे?
अकोला डेपोत यूपीआय तिकीट सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.