
vande bharat express
अमरावती : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ (Vande Bharat Express) ट्रेन कधी गुरांना आदळल्याने तर कधी अन्य कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता ही ट्रेन सिगारेटमुळे चर्चेत आली. सिगारेटच्या धुरामुळे इतकी भीषण स्थिती ओढावली की प्रवासी बाहेर पडण्यासाठी अगदी ट्रेनच्या खिडक्यादेखील तोडायला लागले. तिरुपतीहून सिकंदराबादला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये हा भयानक प्रकार घडला आहे.
वंदे भारत ट्रेन आंध्र प्रदेशातील तिरुपतीहून सिकंदराबादला जात होती. ट्रेनने गुडूर स्थानक ओलांडले होते आणि ट्रेनचे शेवटचे ठिकाण सुमारे 8 तासांच्या अंतरावर होते. सर्व प्रवासी ट्रेनमध्ये आरामात प्रवास करत होते. तेव्हा एका प्रवाशाला सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा झाली. लोकांना काही त्रास व्हायला नको, म्हणून तो प्रवासी शांतपणे ट्रेनच्या टॉयलेटमध्ये गेला आणि तिथे धूम्रपान करू लागला.
टॉयलेटमध्ये सिगारेटचा धूर पसरताच लगेच फायर अलार्म वाजू लागला. त्यानंतर स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा काम सुरू झाली आणि संपूर्ण डब्यात एरोसोल फवारणीला सुरुवात झाली. फायर अलार्म वाजल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि संपूर्ण ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.