
राजकीय वातावरण तापलं, पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; उमेदवारीसाठी फिल्डिंग
पंढरपूर/नवनाथ खिलारे : पंढरपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. अनेक इच्छुक उमेदवार तन, मन आणि धनाने प्रचाराच्या रिंगणात उतरले असून, चौकाचौकात आणि गल्लीबोळांत निवडणुकीच्या चर्चाना चांगलीच रंगत आली आहे. इच्छुकांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप पक्षाने उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षाच्या वतीने घेतले जाणारे हे सर्वेक्षण अत्यंत काटेकोरपणे पार पाडले जात असून, सर्वेक्षणात जो उमेदवार जनतेत आघाडीवर असेल, त्यालाच अंतिम उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच धावपळ सुरू
पंढरपूर शहरातील चौक, चहाचे टपरी, हॉटेल आणि व्यापारी गल्लींमध्ये निवडणुकीच्या चर्चाना उधाण आले आहे. “कोण कुठल्या पक्षाकडून लढणार?”, “कोणाला जनता पसंती देईल?” अशा चर्चानी वातावरण तापले आहे. काही संभाव्य उमेदवारांनी तर मतदारांशी थेट संपर्क मोहीम सुरू केली असून, जनतेसमोर आपली कामे आणि नियोजित योजना मांडण्यास सरुवात केली आहे.
उमेदवारांची भाऊगर्दी
पंढरपूर नगरपरिषदेचे एकूण १८ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते. अनुभवी कार्यकर्त्यांबरोबरच नव्या तरुण पिढीतील इच्छुकही मोठ्या उत्साहात प्रचारात सहभागी होत आहेत. जनतेत आपला संपर्क, केलेली कामे आणि स्थानिक पातळीवरील योगदान यावरच या निवडणुकीचा तोल ठरणार आहे, असे राजकीय जाणकारातून बोलले जात आहे.
तरुणाईचा जोश आणि अपेक्षांची रंगत
या निवडणुकीत तरुण उमेदवारांचा उत्साह लक्षणीय आहे. अनेक तरुणांनी “आपल्यालाही नगरसेवक व्हायचे” या निर्धाराने तयारी सुरू केली आहे. काही इच्छुक अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता असून, काही जण पक्षीय पाठबळावर मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. काही प्रभागांत तर “एकमेकांची जिरवणूक” करण्यासाठीही काही जण इच्छुक झाले असल्याची चर्चा आहे.