
तासगावमध्ये पुन्हा रंगणार राजकीय महासंग्राम; रोहित पाटील अन् संजय पाटील यांच्या गटात हाेणार घमासान
मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने तब्बल २१ पैकी १३ नगरसेवक निवडून देत एकहाती सत्ता मिळवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८ जागा होत्या. त्यानंतर सत्ताधारी गटात अंतर्गत मतभेद उफाळले, तर प्रशासकीय कारभार सुरू राहिला. जवळपास तीन वर्षांपासून नागरिकांना निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीचा त्रास सहन करावा लागत होता. आता अखेर ती प्रतीक्षा संपली असून २ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तासगावच्या गल्लीबोळांत आधीच चर्चा सुरू झाली आहे.“या वेळी कोणाचा झेंडा फडकणार? रोहित पाटील , संजय पाटील की भाजप? उत्तर मतपेटीत बंद होईल, पण राजकीय तापमान मात्र आधीच चढले आहे!
महिला नगराध्यक्ष कोण?
या निवडणुकीत १२ प्रभागांतून २४ नगरसेवक निवडले जाणार असून, यावेळी नगराध्यक्षपद महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. एकूण २४ नगरसेवकांपैकी २ जागा अनुसूचित जातींसाठी, ६ ओबीसींसाठी तर उर्वरित १६ खुल्या राहणार आहेत. २४ मधून १२ महिला नगरसेवक निवडल्या जाणार आहेत. यामुळे महिला नेतृत्वाच्या नव्या चेहऱ्यांचा उदय हाेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विद्यमान आमदार विरुद्ध माजी खासदार
आमदार रोहित पाटील यांच्यासाठी ही निवडणूक केवळ नगरपरिषदेपुरती मर्यादित नाही; तर त्यांच्या कार्यपद्धती, जनसंपर्क आणि संघटनशक्तीची कसोटी आहे. दुसरीकडे माजी खासदार संजय पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक राजकीय पुनरागमनाची संधी आहे. मागील सत्ताकाळातील यशावर स्वार होत ते पुन्हा तासगावमध्ये झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहेत.
भाजप स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार
दरम्यान, भाजपने आपले स्वतंत्र उमेदवार देत सत्ता समीकरणात गोंधळ निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच तासगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ताकतीने नगरपालिका निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे यावेळी तासगावमध्ये राजकीय तिरंगी रणधुमाळी होणार असून, एकही पक्ष सहजपणे मैदान सोडण्याच्या मनःस्थितीत नाही.
कोणाचे वर्चस्व राहणार?
निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही गटांत बैठकींचा पाऊस पडू लागला आहे. कार्यकर्त्यांची धावपळ, माेटबांधणी आणि उमेदवार ठरवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शहरात चहूकडे चर्चेचा विषय एकच
एकीकडे आमदार रोहित पाटील यांचे समर्थक ‘विकासासाठी सातत्य’ या मुद्द्यावर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे माजी खासदार संजय पाटील यांचे कार्यकर्ते ‘भाजपच्या अपयशाविरुद्ध परिवर्तन’ या भूमिकेत उतरले आहेत.
शेवटचा टप्पा निर्णायक ठरणार
अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून, पुढील तीन आठवडे तासगावचे राजकारण अक्षरशः रणांगणात बदलणार आहे. प्रत्येक प्रभागात काटे की टक्कर अपेक्षित असून, मतदार कोणाच्या बाजूने झुकतात, हे पाहणे आता सर्वांचेच लक्ष वेधून घेणार आहे.