
Alumni associations of 1625 schools in Jalgaon formed for school development Jalgaon News Update
जळगाव : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे भौतिक व शैक्षणिक विकासासाठी सीईओ मिनल करनवाल यांनी माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक व भावनिक नात्याला नव्या ऊर्जेचा स्पर्श देणारा माजी विद्यार्थी संघचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. ४ एप्रिल २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमात सीईओ करनवाल यांनी ही संकल्पना जाहीर केली होती.
याप्रसंगी त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाला प्रतिसाद मिळत, १६२५ शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघांची स्थापना करण्यात आली आहे. या संघांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना आतापर्यंत ८ लाख ८४ हजार ५६० रुपयांची वस्तूरूपी व आर्थिक मदत मिळाली आहे. यात बेंच डेस्क, स्मार्ट टीव्ही, संगणक, पुस्तके, क्रीडा साहित्य, फर्निचर, पंखे, टाईल्स, रंगकाम, शाळा फलक, तसेच काही ठिकाणी आर्थिक स्वरूपात देणगी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जळगाव जिल्ह्यातील उपक्रमाची दखल घेत, माजी विद्यार्थी संघ या संकल्पनेचा राज्यभर विस्तार करण्याचा शासन निर्णय जारी केला असून जळगाव पॅटर्न म्हणून राज्यभर परिचित होवून मार्गदर्शक ठरत आहे. सीईओ करनवाल यांच्या नेतृत्वाखाली जि.प.ने शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा व संसाधन विकास या तिन्ही स्तरांवर व्यापक सुधारणा घडविण्याचा संकल्प केला आहे. शाळा केवळ अध्यापनाचे केंद्र न राहता सामाजिक बांधिलकी आणि सहकाराचा केंद्रबिंदू बनाव्यात, या दृष्टीने माजी विद्यार्थी संघ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
दिवाळीच्या सुट्टीत माजी विद्याथी मेळावा
दिवाळीच्या सुटीत गावाकडे परतलेले अनेक माजी विद्यार्थी आपल्या शाळांशी पुन्हा जोडले गेले. माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यांमध्ये बालपणीच्या शाळेत पुनः एकदा पाऊल ठेवून शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेच्या गरजा जाणून मदत करण्याचा संकल्प केला. काही ठिकाणी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळांची रंगरंगोटी केली, परिसर स्वच्छ केला, ग्रंथालयासाठी पुस्तके दिली, तर काहींनी लहान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्याने घेतली. यामुळे शाळा, विद्यार्थी, शिक्षक व माजी विद्यार्थी बंध अधिक दृढ झाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जिल्हाभर शाळांचा होणार सर्वांगीण विकास
माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून मिळालेल्या भेटवस्तू व निधीच्या साहाय्याने शाळांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणे शक्य झाले आहे. शाळांच्या भौतिक सुविधांत सुधारणा, तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची साधने, तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या की, माजी विद्यार्थी संघ हा केवळ आर्थिक मदतीचा उपक्रम नाही, तर तो आपल्यातील माणुसकी, कृतज्ञता आणि शाळेबद्दलच्या आपुलकीचा दुवा आहे. प्रत्येक माजी विद्यार्थी हा आपल्या शाळेचा “बैंड अॅम्बेसेडर’ आहे, त्यांच्या सहभागातून शाळांचा खरा विकास घडणार आहे.