लोकल बॉडी इलेक्शन 2025 महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी देवदर्शन ट्रीप आणि पैठणीचा खेळ रंगला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Local Body Elections 2025: वडगाव मावळ : सतिश गाडे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लवकरच निवडणूका जाहीर होणार असून जोरदार तयारी सुरु आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठका, दौरे वाढले आहेत. त्याचबरोबर इच्छुकांनी देखील मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. वडगाव मावळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रभाग आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, इच्छुक उमेदवारांनी पक्षाचे तिकीट मिळण्याची वाट न पाहता थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रचार मोहिमेचा धडाका लावला आहे.
वडगाव शहरात सर्वत्र बॅनर, पोस्टर आणि भेटवस्तूंची रेलचेल दिसत असून काही प्रभागांमध्ये उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ‘खेळ रंगला पैठणीचा’, साडी वाटप, देवदर्शन सहली, अन्नदान कार्यक्रम, भेटवस्तूंचे वितरण अशा उपक्रमांद्वारे मतदारांना आकर्षित करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही महिलांना प्राधान्य देत प्रचार केला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काही उमेदवार महिलांना प्राधान्य देत महिला बचतगट मेळावे आयोजित करत आहेत, तर तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी क्रीडा स्पर्धा आणि सोशल मीडिया प्रचार मोहिमा राबविल्या जात आहेत. काही ठिकाणी मुलांसाठीही चित्रकला, नृत्य आणि मनोरंजन स्पर्धा घेऊन कुटुंबांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या सर्व उपक्रमांमुळे शहरात निवडणुकीचा जल्लोष दिसत आहे, परंतु दुसरीकडे काही नागरिकांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सुरू झालेल्या या “खर्चिक प्रचारशैली”वर नाराजी व्यक्त केली आहे. “खरा प्रचार हा कामांवर, विकासावर आणि जनसेवेवर असायला हवा, पैशाच्या जोरावर नव्हे,” असे मत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले आहे.
उमेदवारीसाठी जोरदार हालचाली
दरम्यान, ही निवडणूक महिला आरक्षित असल्याने वडगावच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा कोण होणार याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. अनेक नामांकित महिला इच्छुकांनी तयारी सुरू केली असून, प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वडगाव नगरपंचायतीत गेल्या काही वर्षांत विकासकामांबाबत नागरिकांमध्ये असंतोष असल्याचे चित्र दिसत असल्याने या वेळी मतदार बदलाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. त्याचवेळी काही अनुभवी महिला कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या जनतेच्या मनात आपली प्रतिमा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या वडगाव शहरात प्रत्येक चौकात निवडणुकीची चर्चा रंगली आहे. चहाच्या टपऱ्यांपासून ते कार्यालयांपर्यंत “या वेळी कोण?” या प्रश्नावर वादविवाद होताना दिसत आहेत. पुढील काही दिवसांत पक्षांचे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीची स्पर्धा आणखी तापणार यात शंका नाही.






