
मुंबई: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget) सभागृहात सादर करण्यात आला आहे. दरम्यान यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
अर्थसंकल्पाबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, महाविकास आघाडीची जी पंचसूत्री होती त्याचेच नाव बदलून पंचामृत ठेवण्यात आलं आहे. कुठेही शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला नाही. ज्या योजना अजित पवार मुख्यमंत्री असताना जाहीर करण्यात आल्या होत्या, त्याच घोषणा पुन्हा करण्यात आल्या आहे. या अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला असल्याचं दानवे म्हणाले आहे.
या अर्थसंकल्पाला जुमलेबाजी म्हणता येईल. महिलांना न्याय मिळाला नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि बेरोजगारांना देखील न्याय मिळाला नसल्याचं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आताच्या सरकारने बेरंग अर्थसंकल्प मांडला आहे. जनतेशी या सरकारला काहीही देणघेणं नाही. पैसे, उत्पनाचा स्त्रोतच नाही तर या घोषणा कशाप्रकारे केलेल्या आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं दानवे म्हणाले आहेत.