
रुग्णसेवेवर राजकीय सावट! रुग्णांची परवड; आमदार निधीतील रुग्णवाहिकेला 'ब्रेक'
Amravati News: गरीब आणि गरजू रुग्णालयात पोहोचता यावे, या उदात्त हेतूने आ. बलवंत वानखेडे यांच्या स्थानिक विकास निधीतून दर्यापूर नगर परिषदेला देण्यात आलेली रुग्णवाहिका सध्या राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सार्वजनिक आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या या रुग्णवाहिकेच्या वापरावरून नगर परिषदेत मतभेद निर्माण झाले आहेत. खर्चाचे कारण पुढे करून सेवा बाजूला सारली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे २५ ऑगस्ट रोजीच्या नगर परिषदेच्या ठरावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.(फोटो सौजन्य – AI)
दर्यापूर नगर परिषदेवर पूर्वी भाजपची सत्ता असताना काँग्रेसचे आ. बलवंत वानखेडे यांनी आपल्या आमदार निधीतून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, हा त्यामागील मुख्य उद्देश होता. या सुविधेचा अनेक गरजू नागरिकांना लाभही झाला. सत्तांतरानंतरदेखील काही काळ ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत कार्यरत होती.
मात्र, नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आणि त्यानंतर महापौरांसह काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) वाटेवर पाऊल ठेवल्यानंतर या रुग्णवाहिकेचा विषय राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. इंधन, चालकाचे मानधन, देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याची चर्चा आहे.
२५ ऑगस्टच्या ठरावाला विरोध करताना आरोग्य समितीचे अध्यक्ष हबीब खान यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. सार्वजनिक हितासाठी उपलब्ध झालेली रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेतच राहिली पाहिजे, अशी भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नसताना नगर परिषदेची सुविधा बंद पडणे गरीब रुग्णांसाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून रुग्णवाहिका पुन्हा सुरू करावी आणि तिचा प्रभावी वापर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
२५ ऑगस्ट रोजी नगर परिषदेचा ठराव
आरोग्य समिती अध्यक्षांना विश्वासात न घेतल्याचा आक्षेप
रुग्णवाहिकेच्या खर्चाचा मुद्दा ऐरणीवर
सार्वजनिक आरोग्यसेवेच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह