
थंडीचा पारा घसरला, राजकारणाचा चढला; मनपा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला
नामांकन प्रक्रियेदरम्यान विविध पक्षांचे अधिकृत उमेदवार, बंडखोर तसेच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने मोठी आठ लगबग पाहायला मिळाली. नामांकन प्रक्रिया पूर्ण होताच रणधुमाळी जोरात सुरू झाली. अमरावती महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच विविध राजकीय पक्षांमध्ये युती करावी की नाही, तसेच युती झाल्यास जागा वाटपात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या.
अमरावती शहरात एकीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये तीव स्पर्धा सुरू आहे. संपूर्ण शहर निवडणुकीच्या धामधुमीत रंगले आहे. राजकीय हालचालीमध्ये वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी अतिरिक्त सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीनंतर गुरुवारपासून शहरात कडक निगराणी सुरू करण्यात आली आहे. पुढील चार दिवस शहरात पोलिसांची करडी नजर राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व निष्पक्षपणे पार पडावी, यासाठी शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध आपली मोहीम तीव्र केली आहे. अवैध शस्खे, पैशांचे वाटप, दारू तस्करी तसेच इतर सर्व प्रकारच्या बेकायदेशीर हालचालीवर विशेष लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई केली जात आहे.