एकाच शिक्षकावर ६० विद्यार्थ्यांचा भार
अमरावती : शिक्षण विभागाच्या बेताल कारभारामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. हिंगणघाट पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मोझरी (शेकापूर) येथील जि. प. प्राथमिक केंद्र शाळेत एका शिक्षकावर तब्बल 60 विद्यार्थ्यांचा भार पडल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मोझरी येथील प्राथमिक केंद्र शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून सध्या अंदाजे 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत यापूर्वी तीन शिक्षक कार्यरत होते. मात्र, शिक्षण विभागाने एकाचवेळी या तिन्ही शिक्षकांची बदली केल्याने शाळेत फक्त नव्याने आलेल्या एकाच शिक्षकावर चारही वर्गांचा पूर्ण भार पडला आहे.
गावातील जवळपास ३ हजार लोकसंख्येतील कुटुंबांचा विश्वास या शाळेवर आहे. मोझरी प्राथमिक केंद्र शाळेंतर्गत कापशी, पोटी आदी गावातील शाळा येतात. पटसंख्या भरपूर असतानाही एका शिक्षकाला ६० विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शिक्षण योग्य पद्धतीने होत नसल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तातडीने शिक्षक द्या; या परिस्थितीत गावकऱ्यांकडून शाळेत तातडीने शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणावर गदा येऊ नये म्हणून तातडीने अतिरिक्त शिक्षक पाठवावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
अधिकाऱ्यांची ग्वाही
या संदर्भात पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल गायकवाड यांनी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी पंचायत समितीअंतर्गत १२५ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, केवळ १०५ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. नव्याने शिक्षक भरती बंद असल्याने सर्व शाळांना पूर्णपणे शिक्षक पुरवणे शक्य नाही. तरीही मोझरी शाळेत शक्य तितक्या लवकर शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांमध्ये संताप
मोझरी येथील प्राथमिक केंद्र शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून सध्या अंदाजे ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, एकाच शिक्षकांवर भार येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षक नुकसान होत आहे. शाळेतील या अव्यवस्थेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून, लवकरच शिक्षकांची नेमणूक न झाल्यास मोठ्या आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.