
मध्यान्ह भोजनातून १२ विद्यार्थ्यांना विषबाधा
अंजनगाव सुर्जी : सीताबाई संगई शाळेत मध्यान्ह भोजनात देण्यात आलेली खिचडी खाल्ल्याने तब्बल १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि.२४) उघडकीस आली. या प्रकरणी एका पालकाने मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करून करार रद्द करण्याची मागणी केली आहे.
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा मुख्य उद्देश वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखणे, शाळांतील नोंदणी व उपस्थिती वाढवणे हा आहे. मात्र, याच योजनेतील अन्न मुलांच्या जीवाला धोका ठरत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या योजनेंतर्गत अन्नाच्या गुणवत्तेवर देखरेख करण्याची जबाबदारी पंचायत समितीतील पोषण अधीक्षकांकडे असते. मात्र, या प्रकरणात पोषण अधीक्षकांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष करत कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे.
हेदेखील वाचा : Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्र पोरका, तिरंगा अर्ध्यावर! उपमुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी काय आहे प्रोटोकॉल? जाणून घ्या नियम
दरम्यान, मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले की, खिचडी पुरवठा करणारा कंत्राटदार व शालेय पोषण अधीक्षक हे या प्रकरणास जबाबदार आहेत. शहरातील काही शाळांना खिचडी शिजवण्याचे व पुरवण्याचे कंत्राट ‘नुरैल’ नावाच्या बचतगटाला देण्यात आले असून, त्यांचे स्वयंपाकघर सुर्जी परिसरात आहे. स्वयंपाकघर अन्न व औषध प्रशासनाचा परवाना व सूचना फलक नसतानाही चालवले जात असल्याचा आरोप आहे.
किचन करण्यात आले स्वच्छ
या घटनेनंतर दोष लपवण्यासाठी स्वयंपाकघर तत्काळ स्वच्छ करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तरीही पोषण अधीक्षक शीला आठवले कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून होत आहे.
ओडिशातही विषबाधेची घटना
दुसरीकडे, ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील इटाप गावात संशयास्पद अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. चिकन करी आणि पालक खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तिघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अन्नातून विषबाधा असल्याचे मानले जात आहे आणि चौकशी सुरू आहे.