फोटो सौजन्य- सोशल मीडिया
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचा दारुण पराभव झाला आहे. तिसऱ्या आघाडीच्या सरकारसाठी प्रयत्न करत असलेल्या बच्चू कडू यांना जोरदार धक्का बसला आहे. अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील या लढतीमध्ये विद्यमान आमदार बच्चू कडू यांचा भाजप उमेदवार प्रवीण तायडे यांनी पराभव केला आहे. 18 व्या फेरीत बच्चू कडू हे 21 734 मतांनी मागे होतेच शिवाय ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. 2004 पासून बच्चू कडू हे सलग 4 वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते मात्र यावेळी त्यांना जनतेने नाकारले आहे.
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मागील निवडणुकीमध्ये 2 जागा जिंकता आल्या होत्या. अचलपूर विधानसभेतून तीन टर्म कडू यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. तर 2019 मध्ये पक्षाच्या नावाने पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. 2019 मध्ये ते महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीमध्ये त्यांनी शिंदे गटाची साथ दिली होती. त्यामुळे ते शिंदे गटासोबत महायुती सरकारमध्ये सामील झाले.
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी महायुतीशी फारकत करत वेगळी भूमिका घेतली आणि त्यांनी संभांजीराजे छत्रपती, शेतकरी नेत राजू शेट्टी यांनी एकत्र येत स्वतंत्र आघाडी स्थापन केली.
सरकार स्थापन करण्याचा केला होता दावा
राज्यात एक्झिट पोल आल्यानंतर सरकारच आमचंच येणार असून अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार बनेल असा दावा त्यांनी केला होता. ते म्हणाले होते की, मोठ्या पक्षांचा पाठिंबा बाहेरून घेऊ. तशा पद्धतीची चर्चा सुरु आहे. आमच्याऐवजी कोणतेही सरकार सत्तेत येणार नाही. महाविकास आघाडीला किंवा महायुतीला पाठिंबा देण्यापेक्षा आपणच सरकार बनवू आणि त्यांचा बाहेरून पाठिंबा घेऊ. तसंच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोणतीही युती आघाडी बहुमतापर्यंत जाताना दिसत नाही, त्यामुळे आम्ही असल्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला होता.
महायुतीचे वादळ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीचा झंझावात पाहायला मिळत आहे.महायुतीला तब्बल 227 जागा मिळाल्या आहेत. 127 जागांवर आघाडी मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपचे हे यश 2014 पेक्षाही मोठे ठरले आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने तब्बल 57 जागा आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने 39 आघाडी मिळवली आहे.
महाविकास आघाडी नेस्तनाबूत
महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाल्याचे पाहायला मिळत असून केवळ 58 जागांवर आघाडी मिळाली आहे. कॉंग्रेसला 21 जागा, शिवसेना ठाकरे गट 19 जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गट13 जागांवर आघाडीवर आहे.