
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अमरावतीमध्ये कार्यक्रम
अमरावती: संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या जीवनातून स्वच्छता, समाजसेवा आणि मानवतावाद यांचा आदर्श घालून दिला. गावोगावी जाऊन त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि दारू, अंधश्रद्धा व सामाजिक दुर्गुणांविरुद्ध जनजागृती केली. भिक्षेतून मिळालेल्या पैशांतून त्यांनी धर्मशाळा, शाळा, रस्ते व विहिरी उभारण्याचे कार्य केले. कर्मकांडाला विरोध करून त्यांनी माणुसकी, समता आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. समाजातील उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी अविरतपणे कार्य केले. स्वच्छता, समाजसेवा आणि समतेचा संदेश देणारे गाडगेबाबांचे कार्य आजच्या समाजासाठी, तरुण पिढीसाठी आणि विषेशतः विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रा. पी. आर. एस. राव यांनी केले.
तक्षशिला विधी महाविद्यालय येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्याम तंतरपाळे तर अतिथी म्हणून प्रा. डॉ. राजेश देशमुख, प्रा. अॅड. विशाखा सोनटक्के, प्रा. अॅड. भारत ढोके, अॅड. हरीश निभाळकर, अॅड. उज्वल सोनवणे, प्रा. स्वप्नील मानकर, प्रा. मेघा चिमणकर, प्रा. ज्योती टाले, प्रा. राधा काळे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश म्हस्के, सह प्रा. दीपाली पडोळे, प्रा. डॉ. अंभोरे, प्रा. डॉ. खेडकर, प्रा. डॉ. शुद्धोधन कांबळे प्रा. दीपाली गवई आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. राव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा हे दोघेही राष्ट्राच्या समाजसुधारणेच्या परंपरेतील महत्त्वाचे समन्वयी व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेबांनी सामाजिक समता, मानवाधिकार, शिक्षण आणि संविधानिक मागनि अन्यायाविरुद्ध संघर्ष केला, तर गाडगेबाबांनी स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि करुणेच्या मूल्यांद्वारे समाजजागृती घडवली. बाबासाहेबांचा विचार बौद्धिक व संघटनात्मक पातळीवर क्रांती घडवणारा होता, तर गाडगेबाबांचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचले. जातिभेद, दारिद्रध आणि सामाजिक विषमता नष्ट व्हावी, हा दोघांचाही समान ध्यास होता.
त्यामुळे विचारांची दिशा वेगळी असली तरी उद्दिष्ट एकच असल्याने बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यात वैचारिक व कृतीशील समन्वय स्पष्टपणे दिसून येतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रा. डॉ. तंतरपाळे महणाले, संत गाडगेबाबांचे विचार अत्यंत व्यवहार्य आणि समानाभिमुख होते. त्यांच्या मते खरे शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे, तर स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, नैतिकता आणि समाजसेवेची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया होय. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजातील दुःख, अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे ते मानत.
संत गाडगेबाबांचे विचार व्यवहार्य
संत गाडगेबाबांचे विचार अत्यंत व्यवहार्य आणि समानाभिमुख होते. त्यांच्या मते खरे शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे, तर स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, नैतिकता आणि समाजसेवेची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया होय. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजातील दुःखा, अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे ते मानत. सामाजिकतेच्या दृष्टीने शिक्षणाने माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे, भेदभाव नष्ट झाला पाहिजे आणि सेवाभाव विकसित झाला पाहिजे, असे प्रा. डॉ. तंतरपाळे म्हणाले.
सामाजिकतेच्या दृष्टीने शिक्षणाने माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे, भेदभाव नष्ट झाला पाहिजे आणि सेवाभाव विकसित झाला पाहिजे, प्रास्ताविक प्रा. दीपाली पडोळे यांनी केले. संचालन समीर वाघमारे यांनी केले. आभार दिव्या सगळे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांच्या अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, शिक्षक व शिक्षकेतर सर्व सहकारी आदींनी सहकार्य केले.