भीमकुंड धबधबा पर्यटकांना खुणावतोय, डोंगरांच्या कुशीतील चिखलदऱ्याचं निसर्गसौंदर्य खुलले
सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या चिखलदऱ्याचे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात खुलले आहे. डोंगरांच्या कुशीतून कोसळणाऱ्या भीमकुंड धबधब्याचा शुभ्र जलप्रपात, खोल दऱ्यांमधून वर येणारे धुक्याच्या लाटा आणि पावसाच्या सरी यामुळे चिखलदऱ्याचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना वेड लावत आहे. असा हा निसर्गाचा नजराना डोळ्यात साठविण्यासाठी शेकडो पर्यटक चिखलदऱ्यात दाखल होत आहे. चिखलदरा येथील परतवाडा मार्गावर अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलाच्या कुशीत भीमकुंड धबधबा आहे. 3500 हजार फूट खोल दरी असून, उंच डोंगरावरून कोसळणारा जलप्रपात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. पावसाळ्याच्या दिवसांत, विशेषतः जून ते ऑगस्ट दरम्यान येथे अनेक लहान-मोठेधबधबे कोसळताना दिसतात. सकाळच्या सुमारास धुक्यातून झिरपणाऱ्या पाण्याच्या धारा पाहताना मनाला वेड लावते.
Maharashtra Rain: कोसळधार थांबणार! राज्यात पाऊस ‘इतके’ दिवस ब्रेक घेणार; कसे असणार वातावरण?
अमरावतीसह नागपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा येथून पर्यटकांचा ओघ सुरू होतो. 15 ऑगस्टपर्यंत गर्दीचा शिखर असतो, तर दिवाळी ते 31 डिसेंबरदरम्यान देखील पर्यटक येथे भेट देतात. काही पर्यटक नाशिक, पुणे, जळगाव, धुळे येथनही प्रवास करून येथे पोहोचतात. हा परिसर निसर्गसंपन्न व धोकादायक उतारांनी भरलेला आहे. त्यामुळे पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जंगलात आणि दरीच्या टोकावर फोटो काढताना दक्षता आवश्यक आहे.
ही केवळ निसर्गाची देणगी नाही, तर पौराणिकदृष्ट्याही महत्त्वाचे स्थान आहे. महाभारतातील कथेनुसार, पांडव अज्ञातवासात असताना याच परिसरात वास्तव्याला होते. भीमाने किचकाचा वध करून त्याला खोल दरीत फेकून दिल्याची आख्यायिका आहे. त्या प्रसंगात भीमाने ज्या कुंडात हात धुतले, त्यालाच पुढे ‘भीमकुंड‘ हे नाव प्राप्त झाले. तर चिखलदऱ्याचे मूळ नाव ‘किचकदरा‘ असल्याचीही दंतकथा सांगितली जाते.