राज्यात पाऊस विश्रांती घेणार (फोटो- ani)
पुणे: राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा भागात अति ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र आता कदाचित पाऊस काही दिवस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस वरुणराजा ब्रेक घेऊ शकतो. मात्र राज्यात हलक्या ते तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेला अंदाज नेमका काय आहे ते पाहुयात.
पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे. मात्र २० जुलैनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यातील अनेक भागात बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. अरबी समुद्रातून निर्माण होणारे मान्सूनचे वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय नसल्याने पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात हवेचा दाब जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर सक्रिय होण्याची शक्यता आहे.
आधी कुठे आणि कसा झाला पाऊस?
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हाहाकार माजवला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला होता. नाशिक आणि पालघरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. पालघरमधील सूर्या नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे धामडी धरणाचे सर्व 5 दरवाजे उघडण्यात आले होते. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत होत्या. नाशिकमध्येही गोदावरी नदी वाहत आहे. ज्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. प्रशासनाने पर्यटन स्थळांवर अलर्ट जारी केला होता. लोकांना नद्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे.
राज्यात बऱ्याच ठिकाण जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह अत्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. याशिवाय, कोल्हापूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागातही यलो अलर्ट जारी केला गेला होता.
कोकण विभागात ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.