amruta and anil
मुंबई: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर दिल्याच्या प्रकणातील मुख्य सूत्रधार अनिल जयसिंघानी याला अखेरीस गुजरातमधून (Gujrat) अटक (Anil Jaisinghani Arrest) करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी हा मोठा बुकी असून गेल्या 7 वर्षांपासून तो फरार होता. त्याला अटक करुन मुंबई क्राईम ब्रांचनं मोठी कारवाई केल्याचं मानण्यात येतंय. ईडी आणि 5 राज्यांतील पोलीस त्याच्या मागावर होते. अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिला काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली होती. तर अनिल जयसिंघानी हा फरार होता. आता त्याला अटक करण्यात आली आहे. जयसिंघानी यानं कट करुनच हा सर्व प्रकार केल्याचा आरोप करण्यात येतोय. फडणवीस यांच्या कुटुंबाला अडकवण्यासाठी हा राजकीय ट्रॅप असल्याची शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आता जयसिंघानी यांच्या अटकेनंतर जयसिंघानी याच्या चौकशीत काही मोठी नावं या प्रकरणात समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोण आहे अनिल जयसिंघानी?
1. अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच ऑफर केल्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार
2. मुलगी डिझायनर अनिक्षाच्या मार्फत अमृता फडणवीस यांच्याशी संबंध
3. अमृता यांच्या तक्रारीनंतर अनिक्षा अटकेत, आता जयसिंघानीलाही अटक
4. अनिल जयसिंगानी मोठा कुख्यात बुकी असल्याची माहिती
5. त्याच्यावर 15 गुन्हे, गेल्या 7 वर्षांपासून फरार
6. 2015 साली त्याच्या घरावर ईडीची धाड
7. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आसाम, मध्यप्रदेशचे पोलीस जयसिंघानीच्या शोधात
8. लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणं आणि पैसे उकळणं हे उद्योग
9. बेटिंग आणि सट्टा, ब्लॅक मेलिंगचे अनिल जयसिंघानीवर आरोप
10. गुजरातमध्ये मोठ्या बेटिंग सर्कलचा भांडाफोड, त्यात अनिल जयसिंघानी याचाही समावेश
11. आतंरराष्ट्रीय बुकी रॅकेट, मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी
12. पोलिसांना चकवा देण्यात हुशार, घरातील डॉबरमॅन पोलिसांच्या अंगावर सोडी.
13. अटकेवेळी ऑक्सिजन कमी असल्याचं भासवून हॉस्पिटलमध्ये दाखल होत असे.
12. अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा दावा, अनेकांसोबत त्याची छायाचित्रं
जयसिंघानीकडच्या व्हिडीओत काय ?
अनिल जयसिंघानी यानं अमृता फडणवीस यांना 40 व्हिडिओ क्लीप्स, ऑडिओ क्लीप्स आणि मेसेजेस पाठवले होते. त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करण्याचा किंवा धमकी देण्याचा त्याचा मानस होता. आता या व्हिडीओ क्लीप्समध्ये नेमकं काय आहे ते समोर येणार आहे. तसंच या व्हिडीओ क्लीप्स इतर कुणाकडे आहेत हेही समोर येण्याची शक्यता आहे. अनिल जयसिंघानी केवळ गुन्ह्यांतून सुटका मिळवण्यासाठी हे करत होता की यामागं काही राजकीय षडयंत्र होतं याचाही शोध त्याच्या चौकशीत लागणार आहे.