पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात पुणे पोलिसांत कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीमुळे दिलीप खेडकर हे पुन्हा अडचणीत येणार असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी अर्जाची चौकशी सुरू केली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार दिलीप आकडे यांनी तक्रार अर्ज दिला आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून पूजा खेडकर यांची पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती. दरम्यान यानंतर मात्र त्या स्वतंत्र कॅबिन, शिपाई तसेच खासगी गाडीवर अंबर दिवा यामुळे वादग्रस्त ठरल्या. त्यांनी व त्यांच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पूजा यांना सुविधा द्यावी यासाठी एकप्रकारे दबाव आणला. याबाबत शासनाला एक अहवाल सादर केला होता. तत्पुर्वी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन, शिपाई किंवा इतर गोष्टी नसतात. मात्र त्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. यामुळे त्या वादात अडकल्या.
हे सुद्धा वाचा – नार्कोटिक्स विभागातून बोलत असल्याचे सांगून महिलेची फसवणूक, 4 जणांना अटक
दरम्यान आता याप्रकरणी तहसीलदार दिलीप आकडे यांनी कामात अडथळा आणला असल्याबाबत तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला आहे. त्या अर्जाची चौकशी सुरू केली असून, संबंधित तहसीलदार यांना जबाबासाठी बोलवण्यात आले होते. मात्र ते आज येऊ शकले नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.