Aaple Sarkar Seva Kendra: राज्यात 'आपले सरकार सेवा केंद्रां'ची संख्या वाढणार; आशिष शेलारांनी जाहीर केले 'हे' निकष
मुंबई: राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी “आपले सरकार सेवा केंद्र” सुरू करण्यात आले आहे. आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढविणे व या केंद्रांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरवाढीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदन केले. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा,लाभ मिळविण्यासाठी लागणारा श्रम, निधी व वेळ यांचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विहित मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या कमी असल्या कारणाने आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्याचे सुधारित निकष जाहीर केले आहेत.
सुधारित निकष
५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात -सेवा केंद्रांची संख्या – २, ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ५हजार पेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) – ४, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र – १२हजार ५०० लोकसंख्येसाठी – २,
इतर महानगरपालिका व नगरपरिषद – १० हजार लोकसंख्येसाठी – २, प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात – २
५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत – ४ असे असणार आहेत.
सुधारित सेवा दर
सेवा शुल्क सुधारित दर – ५० रुपये,राज्य सेतू केंद्राचा वाटा २.५ रू.(५%),महआयटीचा वाटा दर – १० रू. (२० %) जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा, दर – ५ रू. (१० %),आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा वाटा (VLE) दर – ३२.५० रू. (६५%) असे असणार आहेत. तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात येत असून प्रत्येक घरपोच भेटीसाठी प्रति नोंदणी प्रत्येकी 100 रुपये (कर वगळून) एवढे सेवाशुल्क आकारण्यात येईल.
Ashish Shelar: मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारणार; आशीष शेलारांची घोषणा
दर सेवाशुल्क संबंधित केंद्र चालकांद्वारे अर्जदारांकडून आकारण्यात येईल या शुल्काची विभागणी महा आयटीचा सेवा दर प्रत्येक ऑनलाईन सेवा बुकिंगसाठी २०% (एकूण दाराचा) वाटा, आपले सरकार सेवा केंद्रचालकासाठी सेवा दर घरपोच भेटीसाठी ८०% (एकूण दाराच्या) वाटा. वरील दर व्यतिरिक्त प्रती अर्ज फी ५० रुपये याप्रमाणे अर्जदारकडून सेवाशुल्क घेण्यात येणार असल्याचेही आशीष शेलार यांनी सांगितले.
मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारणार
मुंबई येथे महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार म्हणाले की, वांद्रे पूर्व येथे 6,691 चौरस मीटर जागेवर महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारण्यात येणार आहे. राज्यात जवळपास 17 कोटी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत, त्यापैकी साडेदहा कोटी मुंबईत आहेत. जगभरात अनेक ठिकाणी पुराभिलेख भवन (Archives Building) पर्यटक, अभ्यासक, आणि संशोधकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. अशा ठिकाणी असलेल्या दस्तऐवजांमुळे त्या शहराची, राज्याची आणि देशाची ऐतिहासिक ओळख जपली जाते. महाराष्ट्र राज्यात अद्यापपर्यंत स्वतंत्र असे महाराष्ट्र पुराभिलेख भवन नव्हते.