मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारlए जाणार (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: मुंबई येथे महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार म्हणाले की, वांद्रे पूर्व येथे 6,691 चौरस मीटर जागेवर महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारण्यात येणार आहे. राज्यात जवळपास 17 कोटी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत, त्यापैकी साडेदहा कोटी मुंबईत आहेत. जगभरात अनेक ठिकाणी पुराभिलेख भवन (Archives Building) पर्यटक, अभ्यासक, आणि संशोधकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. अशा ठिकाणी असलेल्या दस्तऐवजांमुळे त्या शहराची, राज्याची आणि देशाची ऐतिहासिक ओळख जपली जाते. महाराष्ट्र राज्यात अद्यापपर्यंत स्वतंत्र असे महाराष्ट्र पुराभिलेख भवन नव्हते.
मात्र, आता हे भवन उभारण्यासाठी वांद्रे पूर्व येथील प्लॉट मिळवण्याची प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. शासनाने तीन महिन्यांतच ही जागा ताब्यात घेतली असून, आता लवकरच या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्याचे काम सुरू होणार आहे. या 6,691 चौरस मीटर क्षेत्रफळात उभारल्या जाणाऱ्या पुराभिलेख भवनात महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे जतन करण्यात येईल. याठिकाणी दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज, सरकारी राजपत्रे, शासकीय नोंदी, तसेच ऐतिहासिक कागदपत्रे जतन करून अभ्यासक व संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाला मोठी चालना मिळणार असून, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हे भवन एक महत्वपूर्ण साधन ठरणार असल्याचेही ॲड. शेलार यांनी सांगितले.
मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारणार
राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेमध्ये याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी निवेदन केले. शेलार म्हणाले की, हे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरेल. येथे भव्य ऑडिटोरियम, कला दालन, संशोधन केंद्र आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुविधा उपलब्ध असतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळावी यासाठी हे केंद्र महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. विदेशी आणि देशी पर्यटकांसाठी हे एक प्रमुख आकर्षण असेल. तसेच, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी एक भव्य व्यासपीठ म्हणूनही या केंद्राचा उपयोग होईल.
वस्तुसंग्रहालयामध्ये प्राचीन वारसा जतन
राज्य वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. येथे महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, उत्खननात सापडलेल्या प्राचीन वस्तू, शस्त्रास्त्रे, शिलालेख, ताम्रपट, मध्ययुगीन वस्त्रप्रकार, शिल्पे, चित्रकला आणि अन्य दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू प्रदर्शित केल्या जातील.
मुंबईत भव्य प्रकल्पाची उभारणी
राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मौजे वांद्रे, सर्वे नंबर 341, नगर भूखंड क्रमांक 629 या 14,418 चौरस मीटर भूखंडाची निवड करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून हा भूखंड सांस्कृतिक कार्य विभागाला विनामूल्य हस्तांतरित केला जाणार आहे. याठिकाणी राज्याच्या पहिल्या सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालयाची उभारणी करण्यात येईल. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.