
साताऱ्यात निवडणुकीचा धुरळा! जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रिया सुरु
निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ जानेवारी अखेर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ८ नामनिर्देशन अर्ज, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी १ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अर्ज दाखल होण्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे नामनिर्देशन अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दि. १७ जानेवारी अखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण २२० नामनिर्देशन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर दि. १९ जानेवारी रोजी एकाच दिवशी १२६ अर्जांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत एकूण ३४६ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
राजकीय पक्षांसह अपक्ष इच्छुकांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज घेतल्याने निवडणूक लढतीबाबत उत्सुकता वाढली आहे. उमेदवारांकडून विविध गटांतील राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू असून, कोणत्या गटातून कोण उमेदवारी दाखल करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
PUNE NEWS : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भाजप–शिवसेना एकत्र?
निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील टप्प्यांत नामनिर्देशन अर्ज दाखल करणे, छाननी, माघारी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.