पुणे जिल्हा परिषद(फोटो-सोशल मीडिया)
आकाश ढुमेपाटील/पुणे : आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व असताना, त्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढाव्यात, असा आग्रह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून वाढत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील लढत दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप–शिवसेना अशी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे १३, तर भाजपचे ७ सदस्य निवडून आले होते. त्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य कायम होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. काँग्रेसचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि काँग्रेसचे भोरचे दुसरे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुरंदर, भोर तालुक्यात भाजपाची ताकद वाढली आहे. दौंडमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल आधीपासूनच प्रभावी मानले जातात.
दुसरीकडे, पुरंदरमध्ये शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे असून, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट)ला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जुन्नर, पुरंदर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा पारंपरिक मतदार आजही मोठ्या प्रमाणात असल्याचे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, इंदापूरमध्ये भाजपातील हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)मध्ये प्रवेश केल्यामुळे त्या भागातील समीकरणे बदलली आहेत. खेड–आळंदी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे आमदार निवडून आले असले, तरी राष्ट्रवादीचे दिलीप यांचीही या मतदारसंघात मोठी ताकद आहे.
एकूण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विचार करता, दौंड, पुरंदर, जुन्नर आणि खेड–आळंदी वगळता बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. हाच बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर भाजप–शिवसेना युती प्रत्यक्षात उतरली, तर राष्ट्रवादीसमोर कडवी लढत उभी राहू शकते. अन्यथा, मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत युतीबाबत अधिकृत घोषणा होते का, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही अत्यंत रंगतदार ठरणार, हे निश्चित आहे.






