कल्याण : ठाणे जिल्ह्याची प्रामुख्याने कल्याण डोंबिवली क्षेत्राची मतदानाची टक्केवारी गेल्यावेळी महाराष्ट्रात सगळ्यात कमी असल्याने मतदान करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिणगारे यांनी दिले आहेत.
जास्तीत जास्त नागरिकांना मतदान करण्यासाठी, प्रवृत्त करणेकामी, कल्याण लोकसभा मतदारसंघ स्वीपचे नोडल ऑफिसर तथा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात शहरातील हॉटेल व्यवसायिक, डॉक्टर्स, विकासक, विविध क्लासेसचे संचालक, रोटरी तसेच इतर एनजीओचे प्रतिनिधी, नाभिक संघटनेचे प्रतिनिधी, ज्वेलर्स संघटनेचे प्रतिनिधी, महाविद्यालयांचे प्राचार्य, एनसीसी, एनएसएस यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महापालिका परिक्षेत्रातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध उपक्रमांचा अवलंब करावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी बैठकीतील उपस्थित मान्यवरांना केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदानाची प्रक्रिया सोमवारी 20 मे रोजी संपन्न होणार आहे. मतदानाचा हा दिवस शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांना लागून असल्यामुळे त्याचप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत असल्यामुळे, विद्यार्थ्यांनी, नव मतदारांनी तसेच पालकांनी मतदानाच्या दिवशी गावी न जाता त्यांस मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे अशा सूचना विविध क्लासेसच्या संचालकांना तसेच महाविद्यालयांना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे या बैठकीस उपस्थित असलेले हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी हे मतदान करणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात हॉटेलमध्ये दर सवलत देऊ करणार असल्याची माहितीही अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी यावेळी दिली.
मतदान जनजागृतीसाठी, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेमार्फत सोशल मीडियाद्वारा अनेक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या मतदान जनजागृतीसाठी लागणारे पोस्टर्स आणि त्यानुसार साहित्य देखील महापालिकेमार्फत पुरविले जाईल, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे दिवशी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी यावेळी केले. सदर बैठकीस महापालिकेचे माहितीआणि जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, उपायुक्त धर्यशील जाधव, रमेश मिसाळ, अवधूत तावडे तसेच विधानसभानिहाय स्वीप नोडल अधिकारी उपस्थित होते.
बैठकीस उपस्थित असलेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी 100% प्रयत्न केले जातील व मागील लोकसभा, विधानसभा वेळेपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढविणार असे आश्वासन दिले.