Ashok Kharat Case : खरातला आधीच लागली होती अटकेची चाहूल; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत...
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण बाहेर येताच अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःच्या ऑफिसमध्येच या महिलेशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आधी हा भोंदूबाबा महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून धार्मिक विधीचे ढोंग करताना दिसत आहे. दरम्यान, अशोक खरात याला 18 मार्चच्या पहाटे नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. पण, अटकेची चाहूल लागताच खरातने शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलात तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता, असा दावा सूत्रांनी केला आहे.
अशोक खरात या भोंदूबाबाला सध्या अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याला आधीच अटकेची चाहूल लागली होती. तेव्हा त्याने एका पंचतारांकित हॉटेलात तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, आता हे अधिकारी कोण? त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी पहिला राजकीय बळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा गेला असताना आता चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार आहे.
अशोक खरातला बुधवारी (दि.१८) अटक झाली. तत्पूर्वी ३ दिवस अगोदर त्याने शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ३ आयएएस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ही भेट विनोद नामक व्यक्तीने घडवून आणली होती. ही विनोद नामक व्यक्ती अशोक खरातसाठी शिर्डी परिसरातील पंटर म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. या बैठकीत नेमके काय झाले? कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली? व त्या ३ अधिकाऱ्यांनी अशोक खरातला कोणते आश्वासन दिले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. पण, खरातवर अटकेची कारवाई झाली तर पुढे काय करायचे, या मुद्यांवर चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे.
पाद्यपूजा करणाऱ्या रुपाली चाकणकर पुन्हा अडचणीत
सिन्नर तालुक्यात अशोक खरातने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्तपदावर महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर होत्या. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, तेव्हापासून अशोक खरात चर्चेत आला होता. अशोक खरात याची पाद्यपूजा करणाऱ्या रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात होती. अखेर त्यांना शुक्रवारी राजीनामा द्यावा लागला.
हेदेखील वाचा : Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण पेटलं! तृप्ती देसाई आणि चाकणकरांमध्ये ‘कोट्यवधींची डील’?; रूपाली ठोंबरेंचा थेट आरोप






