शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास...; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा
पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहीष्कार घालण्याची घाेषणा प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. आश्वासनांची पुर्तता न करता हे राज्य सरकार जात आणि धर्माच्या आधारावर मतांचे विभाजन करीत असल्याचा आराेपही त्यांनी केला. शुक्रवारी पुण्यात झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत कडू यांनी ही भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील, बाळासाहेब देशमुख, शेतकरी नेते अजित नवले, अनिल घनवट आणि पत्रकार रमेश जाधव उपस्थित होते. कडू यांनी घेतलेल्या भुमिकेवर परीषदेची दिशा पुढील बैठकीत ठरविली जाईल असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. तर निवडणुकीवर बहीष्कार टाकण्याचा निर्णय वैयक्तिक असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बाेलण्याऐवजी सत्ताधारी पक्षांनाा जात-धर्माच्या आधारावर मतांचे विभाजन करायचे असल्याचा आराेप कडू यांनी केला. ते म्हणाले, ‘‘तरुणांची दिशाभूल करून राजकारणाच्या खेळात त्यांना ओढले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता फूट पाडणारे प्रचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत आम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही. खेड्यापाड्यातील तरुणांना मतांसाठी तोडले जाईल. त्याला शेतकरी बळी पडतील सध्याचे राजकारण वाहत गेले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित होण्याची गरज असल्याने हा निर्णय घेतला आहे.”
कडू यांनी यापूर्वी रायगड व मोझरी येथे कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. “शेतकऱ्यांची मते विभागली जाऊ नयेत, त्यांच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र यावे, यासाठी हा बहिष्कार हे आमचा ‘ब्रह्मास्त्र’ ठरेल,” असेही कडू म्हणाले.
काेण काय म्हणाले ?
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे शेतमालाला हमीभाव देणे, ही महायुती सरकारची आश्वासने हवेत विरली आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्यापक जनआंदोलन उभारण्याच्या अनुषंगाने या परिषदेत चर्चा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व संघटना एका मंचावर येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठीचा कृती आराखडा तयार करतील त्यासाठी अधिवेशन घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली जाईल. त्यात निवडणुकीवरील बहिष्कार बाबतही चर्चा केली जाईल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
सर्व राजकीय पक्षांनी राजकीय जोडी बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकजूट झाले पाहिजे.
– आमदार कैलास पाटील
शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकरी हिताची पिक विमा योजना लागू करावी, यासह विविध मुद्द्यांवर सर्व शेतकरी संघटनांचा किमान समान कार्यक्रम तयार करून शेतकऱ्यांच्या आगामी अधिवेशनात ठराव केले जातील,
– अजित नवले.