सौजन्य : सोशल मीडिया
पुणे / दीपक मुनोत : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यास तब्बल महिनाभराचा अवकाश असताना आमदार बच्चू कडू आणि संजय काकडे यांनी शरद पवार यांची आज सकाळी भेट घेतल्याने राज्यभर निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. या भेटींमुळे पडद्यामागील हालचालींचा अंदाज येऊ लागला आहे.
आमदार बच्चू कडू हे महायुतीला पाठींबा देणाऱ्या ʻप्रहारʼचे अर्ध्वयू तर संजय काकडे हे पुण्यातील भाजपचे पुण्यातील वजनदार नेते. कडू विदर्भातील तर काकडे पश्चिम महाराष्ट्रातील. कडू यांनी विदर्भात बहूचर्चीत, नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत, धोबीपछाड देण्यात महत्त्वाची भुमिका बजावली. त्यानंतर अमरावतीत दररोज राणा दाम्पत्य विरूध्द कडू यांचा शाब्दीक संघर्ष सुरू आहे. भारतीय जनता पक्ष राणा यांची साथ सोडून आपणास मदत करणार नाही, याची जाणीव एव्हाना कडू यांना झाल्यामुळे त्यांची पावले पवार यांच्या घराकडे वळली, असे दिसत आहे.
हेदेखील वाचा : ‘हर घर तिरंगा मोहीम’ला सुरूवात; मोहिमेत सहभागी होण्याचे भारतीयांना पंतप्रधानांचे आवाहन
तशातच विदर्भात, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळवल्याने, कडू यांना आता महाविकास आघाडीची गरज वाटू लागली आहे. इतकेच नव्हे तर, राणा दाम्पत्याचा सफाया केल्याशिवाय अमरावती जिल्ह्यातील आपल्या मार्गातील अडथळा दूर होणार नाही, असेही कडू यांचे गणित आहे. त्यामुळेही त्यांना जुन्या घरोब्याची गरज भासू लागली आहे.
वास्तविक, कडू यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे यांचा मोठा विश्वास. त्यामुळेच त्यांना ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत लाल दिव्याची गाडी दिली. त्या तुलनेत महायुतीकडून त्यांना फारसे काही मिळाले नाही. अमरावतीत वर्षानुवर्षे भाजप खासदार होता.या परिस्थितीत, कडू हे ठाकरे यांच्याकडे जाऊ शकत होते मात्र सत्ताबदलाच्या काळात, कडू यांनी ठाकरे यांच्या विश्वासाला तडा दिला असे वातावरण निर्माण झाले. परिणामी कडू यांनी शरद पवार यांच्याकडे संपर्क साधला.
हेदेखील वाचा : देशाचे माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांचे निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुसरीकडे, शरद पवार यांच्यादृष्टीने बच्चू कडू यांचे महत्त्व जास्त. फडणवीस -गडकरी यांच्या विदर्भ पट्ट्यातील एक आक्रमक चेहरा कडू यांच्या रुपाने पवार यांना मिळणार. शरद पवार यांचा राष्ट्रवादी विदर्भात तुलनेने दुबळा त्यामुळे कडू थेट पक्षात आले नाही तरी ʻवऱ्हाडाʼत एक चांगला संदेश जाणार, हे निश्चित. थोडक्यात, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, पवारांना – महाविकास आघाडीला पाहिजे तसा ʻमाहोलʼ (नरेटीव) तयार होणार.
या पार्श्वभूमीवर, शरद पवार आणि बच्चू कडू यांची पुण्यात झालेली भेट महत्त्वपूर्ण ठरणार. बरं कडूंच्या अटी मंजूर झाल्या नाही आणि अपेक्षित गठबंधन झाले नाही तरी, वारे कोणत्या दिशेने वाहत आहे… याचा अचूक संदेश, पवार-कडू – काकडे भेटीमुळे राज्यभरात गेला आहे, हे नक्की.
काकडेंची खेळी दबावासाठी
बच्चू कडू यांच्याशिवाय, माजी खासदार संजय काकडे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. काकडे नाना हे गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर नाराज आहेत. विशेषत: पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असताना डावलले गेल्यामुळे या नाराजीत आणखीनच भर पडली. त्यांनी ती जाहीरपणे बोलूनही दाखवली. त्यांचा रूसवा काढण्याचा प्रयत्न झाला पण तो तात्पुरताच.
काकडे यांना राजकारणात पुढे चाल हवी आहे. त्यादृष्टीनेच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात, मित्राच्या खासगी कामासाठी पवारांची भेट घेतली, हा त्यांचा खुलासा विधानसभा निवडणुकीच्या काळात कुणालाही सहजासहजी पटणारा नाही. अशी भेट ही स्वपक्षातील नेत्यांवर दबावतंत्राचाही भाग असू शकते.