Badlapur School News: बदलापूर घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस 'ॲक्शन मोड'वर; दिले 'हे' महत्त्वपूर्ण निर्देश
बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सकाळपासून नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले आहे. शेकडो नागरिकांनी उपनगरिय रेल्वेची वाहतूकही रोखून धरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा गेल्या दोन तासापासून ठप्प झाली आहे. संपूर्ण बदलापुरात संतापाचे वातावरणआहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरमधील घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, ”बदलापूरमध्ये जी घटना घडली आहे , ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. शाळेतल्या अतिशय दोन लहान मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने ज्या प्रकारचा अत्याचार केलेला आहे. हे अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेचा मोठा उद्रेक जनतेमध्ये पहायला मिळतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणात तात्काळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग ज्या IG स्तरावरील अधिकारी आहेत. त्यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत या घटनेची चौकशी होणार आहे.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”या घटनेत जी कारवाई तातडीने करणे आवश्यक आहे ती केली जात आहे. या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फास्टट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव देखील मागवण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत या नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभागाचा प्रयत्न असणार आहे. अतिशय संवेदनशीलतेने पोलीस विभाग या प्रकरणात काम करत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.”
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी…— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 20, 2024
आज सकाळपासून बदलापुरात वातावरण चिघळले आहे. गेल्या दोन तासांपासून बदलापूर रेल्वे मार्गावर संतप्त आंदोलकांनी रेलरोको केला आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे. पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण बदलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक कऱण्यात आली असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर खुनाचा, बलात्काराचा प्रयत्न आणि पोक्सो कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, असे निर्देश दिले आहेत. तसेच संस्थाचालकावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.