बदलापूर अत्याचार प्रकरणावर महिला नेत्यांची प्रतिक्रिया
बदलापूर : बदलापूरमध्ये अवघ्या 4 वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार करण्यात आला. शाळेमध्ये हे कृत्य घटल्यामुळे सर्वांनी रोष व्यक्त केला आहे. पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर देखील कारवाई न केल्यामुळे संतप्त बदलापूरकरांनी रेल्वे रुळावर आंदोलन केले. पोलिसांनी 12 तासानंतर देखील कारवाई पाऊले न उचलल्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून राज्यभरातून पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून असून नराधमाला अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणावर महिला नेत्यांनी देखील भूमिका घेतली असून गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.
आदिती तटकरेंकडून कारवाईचे आश्वासन
बदलापूर प्रकरणावर महिला-बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील भूमिका व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधत त्यांनी योग्य कारवाईचे आश्वासन सरकारच्या वतीने दिले आहे. बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदिती तटकरे म्हणाल्या, “ही घटना निदंनीय आणि दुर्दैवी आहे. जिल्हा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेतील आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना शाळांमध्ये घडणं हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गृहविभागाकडे आम्ही करणार आहोत. तर पालक आपल्या मुलांना त्या-त्या संस्थेतील लोकांच्या विश्वासावर शिक्षणासाठी पाठवत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना जर शाळेतच घडत असेल तर पालकांना धक्का बसणं सहाजिक आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,” असे मत मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
सुरक्षा देता येत नसेल तर राजीनामा द्या – सुप्रिया सुळे
या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली असून सुरक्षा देता येत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, “बदलापूरमधील दुर्दैवी घटनेत सरकारने पुढे येऊन फास्टट्रॅक कोर्टमध्ये एकदा तरी अशी शिक्षा व्हायला हवी की जेणेकरून अशा घटना परत करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही. अशा प्रकरणातील आरोपींना जेव्हा फाशीची शिक्षा होईल तेव्हाच असे घाणेरडे कृत्य करण्याआधी दहा वेळा नाही तर शंभर वेळा विचार करेल. कायद्याची जरब अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांमध्ये बसली पाहिजे. याची राज्याच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून योग्य ती कारवाई केली पाहिजे. ज्यातील महिलांना पंधराशे रुपये तुम्ही देत आहात त्याचे मी मनापासून स्वागत करते. मात्र त्यासोबतच महिलांना सुरक्षा देखील दिली पाहिजे. पण राज्यातील लेकींना सुरक्षा देता येत नसेल तर सरकारने जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मुलींना शाळेत पाठवायचे नाही का? – प्रणिती शिंदे
त्याचबरोबर खासदार प्रणिती शिंदे यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणाबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत की, “बदलापूरमध्ये जे घडलं, ते अतिशय अंगावर शहारे येण्यासारखं आहे. चार वर्षांच्या मूलींवर अशा प्रकारच्या घटना होत असतील, तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली घालायला लावणारी ही गोष्ट आहे. वारंवार अशा घटना घडत आहे. मुलींना पालकांनी शाळेत पाठवायचे नाही का? पालकांनी कामावर जायचे नाही का ? गुजरातमध्ये बलात्काऱ्यांचे हार तुरे घालून स्वागत केल जातं. त्यांची पदयात्रा काढली जाते, याचा परिणाम कसा दिसणार आहे? समाजाने आता सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का ? राज्यकर्ते आणि प्रशासनावर अवलंबून राहून काहीच होणार नाही. याबाबत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,” असे सवाल उपस्थित करत प्रणिती शिंदे यांनी बदलापूर घटनेवरुन गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितला आहे.