
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नर वाघांच्या हद्दी निश्चित
चांदोली परिसरात सेनापती-सुभेदाराचा वावर
भैरवगड ते पाली-मालदेवमध्ये बाजीची सत्ता
कराड: सह्याद्रीच्या दाट जंगलात पुन्हा एकदा जंगलराजाचा दरारा जाणवू लागला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन बलदंड नर वाघ STR T1 (सेनापती), STR T2 (सुभेदार) आणि STR T3 (बाजी) यांचा वावर सातत्याने सुरू असून, त्यांनी आपापली हद्द निश्चित केल्याने जंगलात वाघांची उपस्थिती ठळकपणे दिसून येत आहे. (Forest Department) चांदोली परिसरात सेनापती आणि सुभेदार हे दोन नर वाघ प्रामुख्याने फिरत असताना, कोयना अभयारण्यात STR T3 ‘बाजी’ याने आपले स्वतंत्र हद्द क्षेत्र निर्माण केले आहे. भैरवगड ते पाली-मालदेव परिसरापर्यंत बाजीचा दबदबा असून, तो याच भागात नियमितपणे शिकार करीत असल्याची नोंद आहे.
कोयना परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये अलीकडेच STR T3 बाजीचे स्पष्ट फोटो व व्हिडिओ कैद झाले आहेत.
सुमारे १६ से.मी x १६ से.मी आकाराचा त्याचा भलामोठा पंजा, त्याचा दरारा अधोरेखित करतो. अंदाजे ३ ते ३.५ वर्षांचा, पूर्ण वाढ झालेला हा नर वाघ असल्याची माहिती वन्यजीव तज्ज्ञांनी दिली. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १७ जानेवारीदरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अखिल भारतीय व्याघ्र गणना (फेज १) झाली. या सर्वेक्षणासाठी देशभरातील केरळ, कर्नाटक, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे ७५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. सर्वेक्षणादरम्यान विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमधून वाघांसह अन्य वन्यप्राण्यांच्या हालचालींची सखोल नोंद घेण्यात आली.
बाजीची डरकाळी…स्वयंसेवक थरारले
या सर्वेक्षणादरम्यान पाली व जुगंटी परिसरात काही स्वयंसेवकांना रात्रीच्या वेळी ‘बाजी’ वाघाच्या जोरदार डरकाळ्या ऐकू आल्या. ही बाब विशेष लक्षवेधी ठरली. कोयनेच्या जंगलात वाघाचे अधिराज्य पुन्हा प्रस्थापित होत असल्याचा हा जिवंत अनुभव असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले.
सह्याद्रीत वंशवृद्धीची नवी आशा
दरम्यान, नुकतेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघिणी सह्याद्रीत सोडण्यात आल्या आहेत. मादी वाघांच्या आगमनामुळे भविष्यात सह्याद्रीत वाघांची वंशवृद्धी होण्याची दाट शक्यता असून, यामुळे वन पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. परिणामी स्थानिक पातळीवर नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे.
निसर्ग-मानव समतोलाचे आशादायी संकेत
सह्याद्रीच्या जंगलात घुमणारी ‘बाजी’ची डरकाळी ही केवळ वन्यजीव संवर्धनाचे यशच नव्हे, तर निसर्ग आणि मानव यांच्यातील समतोलाचे आशादायी संकेत देत आहे.