
Bal Sangopan : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, 'हे' आहे त्यामागील कारण...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजने (Bal Sangopan Fund) बाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील 6 हजार 86 लाभार्थ्यांचे मागील वर्षाच्या ऑगस्ट 2025 पासूनचे अनुदान रखडले आहे. तब्बल 13 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने गरजू बालकांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
महिला व बालविकासअंतर्गत राबणवण्यात येणाऱ्या या योजनेचे सुमारे 17 कोटी 80 लाख 15 हजार 500 रुपयांचे अनुदान प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. तसं पाहता, योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यास दरमहा 2 हजार 250 रुपये अनुदान प्राप्त होते. त्यानुसार धाराशिवमधील 6 हजार 86 लाभार्थ्यांचे एका महिन्याचे अनुदान 1 कोटी 36 लाख 93 हजार 500 रुपये होते. महत्त्वाचे म्हणजे, एप्रिल ते जुलै 2025 या चार महिन्यांचे मानधन जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये जमा करण्यात आले. मात्र, त्यानंतर ऑगस्ट 2025 पासून निधीअभावी अनुदान प्रलंबित असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, पुढील प्रलंबित मानधन दिवाळीपर्यंत जमा होण्याची शक्यता असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गरजू बालकांच्या कुटुंबाचा विचार करता त्यांचा दैनंदिन खर्च, शिक्षण, औषधोपचार इत्यादी गरजा भागवताना त्यांना नक्कीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनाथ बालके, एक पालक असलेली बालके, आई किंवा वडील गंभीर आजाराने ग्रस्त असलेली बालके, गतीमंद किंवा दिव्यांग बालके तसेच आई-वडील दिव्यांग असलेल्या कुटुंबातील बालकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. एका कुटुंबातील दोन बालकांनाही योजनेचा लाभ देण्याची तरतूद आहे.
बाल संगोपन योजनेचा आधार मिळणारी कुटुंबे आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतात. अशा लाभार्थ्यांचे १३ महिन्यांचे अनुदान रखडल्याने शासनाच्या कल्याणकारी योजनेचा प्रत्यक्ष लाभ वेळेत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. लाभार्थ्यांकडून संबंधित कार्यालयांकडे वारंवार पाठपुरावा केला जात असतानाही थकीत रक्कम अद्याप त्यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्याचे चित्र आहे.