बार्शी : शहरातील कासारवाडी रस्त्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर (Abortion Center) शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यासह पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये चार महिलांसह आठ जणांविरोधात बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक करुन बार्शी न्यायालयात उभे केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गायत्री एस. पाटील यांनी २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सुषमा किशोर गायकवाड (वय ४०, परिचारिका, रा. ताडसौंदणे रोड), उमा बाबुराव सरवदे (वय ५०, आया, रा. हिरेमठ हॉस्पिटल), राहुल थोरात (रा.बार्शी औषध पुरवठादार) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत, नंदा गायकवाड (रा. बार्शी), दादा सुर्वे (रा. कुर्डुवाडी), सोनू भोसले (रा. शेटफळ), सुनिता जाधव (रा.बार्शी), अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त शितोळे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना शनिवार रोजी रात्री उघडकीस आली.
कासारवाडी रस्त्यावरील भोईटे कन्स्ट्रक्शन अपार्टमेंटमध्ये सोनल चौरे यांचे घरामध्ये गर्भपात करण्यात येत होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. चारूदत्त शितोळे, दोन पंच यांनी घटनास्थळी छापा टाकला. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात औषधे, किट येथील एक जण येथे गर्भपात करणाऱ्या महिलांना देत होता तर बाकीचे सर्वजण त्यांच्याकडे महिलांना गर्भपात करण्यासाठी पाठवत होते.
सोनोग्राफी करणारा डॉक्टर गर्भ महिला किंवा पुरुष आहे, असे सांगत असे आत्तापर्यंत ३२ गर्भपात करण्यात आले आहेत. तेथील सर्व औषधे, गोळ्या, किट असे ६ हजार १०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड करीत आहेत.