वाल्मिक कराडला कोर्टाचा दणका, कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
बीड जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी आहे. जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. या आरोपांमधून दोषमुक्तीसाठी न्यायालयात केलेला विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. बीड सत्र न्यायालयाने हा अर्ज दिला आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या दोषमुक्त अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत मागील सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता, त्यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान न्यायालयाने आज वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला असला तरी वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे.
न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे वाल्मिक कराडसह इतर आरोपींवरील खंडणीसह खूनाचही खटला सुरू राहणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचं वकील उज्ज्वल निकम यांनी स्वागत केलं आहे.संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनीही या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासात ठोस पुरावे आहेत. त्यामुळे कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळला जाईल, अशी आम्हाला अपेक्षा होती, अशी त्यांनी दिली आहे.
कराडचा दोष मुक्तीचा अर्ज दाखल झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी हा केविलवाला प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं. आज देखील इतर आरोपींनी दोष मुक्तीचे अर्ज केले आहेत. या लढाईचा शेवट आरोपींना फाशी झाली पाहिजे, असंच आमचे मत असल्याचं देशमुख यांनी म्हटले. न्यायालयाच्या निकालानंतर उज्ज्वल निकम यांची मस्साजोगच्या ग्रामस्थांनी भेट घेतली. या पुढील लढा तुम्हीच लढा अशी विनंती केली आहे. तसंच या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळेबाबत तपास करण्यात यंत्रणांना आलेल्या अपयशाबाबतही धनंजय देशमुख यांनी शोकांतिका केली आहे. कृष्णा आंधळेंना शोधून अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. संतोष देशमुख यांचं अपहरण करून अतोनात हाल करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप असून सध्या तो तुरुंगात आहे.