
'लालपरी'तून प्रवास आता होणार सुकर; एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले 'हे' महत्त्वाचे आदेश
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बस वेळेवर सुटत नसल्यामुळे एसटीच्या उत्पन्न आणि प्रवाशी संख्येवर परिणाम होत आहे. आगार व्यवस्थापकांना महामंडळाने दर सोमवारी पहिल्या बसच्या वेळेपासून आगारात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बस फेऱ्यांचे वेळापत्रक तयार करणे, चालक-वाहकांची ड्युटी लावणे आणि वेळेवर बस सोडणे बंधनकारक आहे. यासाठी विशेष बैठकाही घेण्याचे निर्देश एसटी प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
आगार व्यवस्थापकांना पहाटे हजर राहून बसची तपासणी, इंधन भरणे, चालकांची हजेरी, प्रवाशांची माहिती आणि फेऱ्यांचे नियोजन करावे. यामुळे एसटी महामंडळाने आगार व्यवस्थापकांना दर सोमवारी पहिली बस सुटण्याच्या अगोदर आगारात हजर राहण्याचे, तसेच सर्व बस फेऱ्या वेळेवर सोडण्याची आणि गर्दीच्या मार्गावरील बसचे योग्य नियोजन बरोबर होते की नाही, याची खातरजमा करण्याचे आदेशात म्हटले आहे.
हेदेखील वाचा : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले
पुण्यातून राज्य आणि राज्याबाहेर एसटी धावतात. त्यामुळे दिवसरात्र स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारात एसटीची ये-जा सुरू असते. शिवाय लांब पल्ल्याच्या बसेस उशिरा सुटल्यास प्रवाशांचा वेळ वाया जातो. तसेच एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम होतो. यामुळे महामंडळाने या समस्येवर उपाय म्हणून आगार व्यवस्थापकांना सकाळी लवकर हजर राहण्याचे निर्देश दिले. प्रत्येक फेरीच्या सुटण्याच्या वेळेची, उशिराचे कारण आणि व्यवस्थापकांच्या हजेरीची नोंद विशेष नोंदवहीत करावी लागेल.
दरम्यान, ही नोंद महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करावी लागेल. बस १५ मिनिटांपेक्षा जास्त उशिरा सुटल्यास संबंधित व्यवस्थापक, चालक आणि वाहकांवर निलंबन किंवा दंडाची कारवाई होईल. याबाबत महामंडळाने परिपत्रक काढले आहे. एसटीच्या नियोजित फेऱ्या वेळेत पूर्ण झाले की, उत्पन्नात फरक पडेल. परंतु अनेक वेळा वाहतूक कोंडी आणि बस नादुरुस्त झाल्यामुळे बस फेऱ्याला विलंब होतात. त्यामुळे नियोजन करण्यासाठी वाहतूक अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
एसटीचे उत्पन्न वाढीसाठी २५ कलमी कार्यक्रम
एसटीचे उत्पन्न वाढीसाठी २५ कलमी कार्यक्रम आखण्यात आले आहे. यामध्ये याचा समावेश केला आहे. प्रत्येक आगार व्यवस्थापकाला दर सोमवारी पहिली बस सुटायच्या अगोदर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
– अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे.
हेदेखील वाचा : राज्य परिवहनच्या ताफ्यात तब्बल दीडशे बसेसचा तुटवडा; प्रवाशांची होतीये मोठी गैरसोय