विधानसभेआधी भाजप भाकरी फिरवणार; सुमार कामगिरीमुळे 'या' बड्या आमदारांचे तिकीट कापणार?
मुंबई: काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कालपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी बैठकांवर बैठका घेत आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजपने विधानसभेसाठी अत्यंत सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे.
भाजपने यंदा विधानसभेसाठी सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील ५ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिले न जाण्याची शक्यता आहे. या ५ आमदारांच्या यादीत भाजपच्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील विद्यमान आमदार राम कदम यांचे नाव देखील असल्याचे म्हटले जात आहे. असे असल्यास राम कदम यांना हा मोठा धक्का समजला जाणार आहे. राम कदम २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजप भाकरी फिरवण्याची शक्यता आहे.
नुकत्याच लोकसभा निवडणुकीत भाजपचे मिहिर कोटेचा हे राम कदम यांच्या मतदारसंघातून पिछाडीवर गेले होते. दहीहंडी, रक्षाबंधन आणि अशा अनेक धार्मिक स्थळांच्या यात्रेनिमित राम कदम हे सातत्याने चर्चेत असतात. मात्र गेल्या पाच वर्षांमधील त्यांची कामगिरी फारशी चांगली झाली नसल्याने आणि यामुळे त्यांची निवडून येण्याची शक्यता कमी असल्याने त्यांचा पत्ता भाजपकडून कट केला जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच भारती लवेकर, तमिल सेलवन, पराग शाह, सुनील राणे या विद्यमान आमदारांचा पत्ता देखील कट होण्याची शक्यता आहे.
भाजपने २५ जागांवर उमेदवार निश्चित केल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार सध्याच्या विद्यमान सरकारमधील काही मंत्र्यांना डावलण्यात आल्याचे समजते आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते आहे.
भाजकपडून पहिल्या १० उमेदवारांची घोषणा?
नंदुरबार – विजयकुमार गावीत
कोथरूड- चंद्रकांत पाटील
नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस
धुळे ग्रामीण – सुभाष भामरे
धुळे शहर – अनुप अग्रवाल
रावेर – हरिभाऊ जावळे
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव – सुरेश भोळे
शहादा – राजेश पाडवी
सिंदखेडा – जायकुमार रावल