
आगामी निवडणुकांसाठी सांगलीत भाजपची जोरदार तयारी; कार्यकारिणी केली जाहीर
सांगली : भाजपची सांगली शहर जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण आणि मावळत्या पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधीर गाडगीळ होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व मिरज विधानसभा आमदार सुरेश खाडे उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले. या नव्या कार्यकारिणी जाहीर सोहळ्यातून भाजपा संघटनेत नवउमेद आणि नवी ऊर्जा संचारताना दिसली.
पक्षाच्या मूलमंत्राला उजाळा देत—“सर्वांचा साथ, सर्वांचा विकास”—पक्ष अधिक व्यापक, मजबूत आणि परिणामकारक करण्याचा संकल्प सर्वांनी घेतला. जनतेची सेवा, विकासाचे ध्येय आणि संघटनाची बळकटी हा त्रिसूत्री कार्यक्रम पुन्हा अधोरेखित करत आगामी काळात अधिक व्यापक जनसंपर्क, बूथबांधणी आणि युवा सहभागाचे आवाहन करण्यात आले.
भाजपा सांगली शहर जिल्हा संघटनेत मागील कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मावळत्या पदाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. संघटनेतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी काळात सांगली शहरात पक्षाची संघटनवाढ, सर्वसमावेशक जनसंपर्क, विकासाभिमुख उपक्रम व सामाजिक उपक्रमांतून भाजपा अधिक प्रभावीपणे जनतेत पोहोचवण्याचा निश्चय सर्वांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी “एक संघटना – एक लक्ष्य” या भावनेने सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्यात आला. सांगली शहर भाजप पुढील निवडणुकांमध्ये अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य निता केळकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, माजी नगरसेवक, बूथ व शक्तीकेंद्र प्रमुख आणि मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
” भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी असून, संघटनेचा पाया हा कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर आणि कष्टांवर उभा आहे. सांगली जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.” – आमदार सुरेश खाडे