BJP protests against Abu Azmi's controversial statement in Satara
सातारा : समाजवादी पक्षाचे नेते आणि शिवाजीनगर मानखुर्दचे आमदार अबू आझमी हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले. याचबरोबर औरंगजेबाचे कौतुक केल्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. अबू आझमी यांच्या विरोधात विधीमंडळामध्ये देखील निलंबनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. अबू आझमी यांना विधीमंंडळामधून निलंबित करण्यात आले आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्याचे साताऱ्यामध्ये देखील पडसाद पडले आहेत. सातारा भाजपातर्फे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी याच्या फोटोला शेण फासण्यात आले, जोडे मारत फोटो पेटविण्यात आला
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा शत्रू, धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल करून हत्या करणाऱ्या, हिंदुद्वेष्टया औरंगजेबाचे कौतुक केले, त्याचे उदात्तीकरण केले याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे साताऱ्यात पोवई नाका येथे अबू आझमी याच्या फोटोला शेण फासण्यात आले, जोडे मारण्यात आले आणि फोटो पेटविण्यात आला अबू आझमी याचे विधानसभा सत्रातून विलंबन केले असले तरी ते पुरेसे नाही, त्याची आमदार पदावरून हकलपट्टी करावी , एवढेच नव्हे तर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमी बरोबरच त्याच्या सर्व पिलावळीला उत्तर प्रदेशात हाकलून द्यावे, त्या ठिकाणी त्यांचा व्यवस्थित हिशोब ठेवून कार्यक्रम करण्यात येईल, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी ,सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार , मनीषा पांडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे,अनु जाती मोर्चा प्रदेश सचिव शैलेंद्र कांबळे,अनु जमाती मोर्चा प्रदेश सचिव सदाशिव नाईक, माजी नगरसेवक किशोर पंडित आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणाचे पडसाद साताऱ्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये पडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यामध्ये सत्ताधारी नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते अबू आझमी?
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादाला तोंड फुटले आहे. अबू आझमी यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. मात्र त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या एकमताने अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे.