महायुतीमध्ये अजित पवार गटाला घेण्याबाबत नकारात्मक भूमिका येत आहे.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीला राज्यामध्ये मोठा धक्का बसला. राज्यातील एकूण 48 जागांपैकी केवळ 17 जागांवर महायुतीला यश आले. भाजपला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामध्ये आता लवकरच राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. येत्या 6 महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीचा डाव मांडला जाणार असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीमध्ये मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन अजित पवार यांच्या समावेशाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
महायुतीमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करत सामील झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ 4 जागा आल्या. त्यामधील केवळ एका जागेवर अजित पवार गटाला यश आले. केंद्रामध्ये देखील अजित पवार गटाच्या मागणीमुळे एकही केंद्रीय मंत्रीपद मिळालेले नाही. अजित पवार यांना बारामतीचा गड देखील राखता आलेला नाही. यामुळे अजित पवार यांना महायुतीमध्ये ठेवायचे की नाही याबाबत पुर्वविचार करावा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची गणितं मांडली जात आहे. त्यामुळे महायुतीला अजित पवार गट जड झाला आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. आरएसएसच्या लेखामधून अजित पवार यांच्या समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्यानंतर हा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. अजित पवार गटामुळे लोकसभेमध्ये मोठा फटका बसला असून विधानसभेमध्ये सोबत घेण्यात यावे की नाही याचा विचार करण्याची मागणी भाजप कार्यकर्ते करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, कार्यकर्त्यांनी भाजप श्रेष्ठींकडे काही मतदारसंघामध्ये अजित पवार गटाची मते भाजपला पडली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामध्ये माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरुर या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे अजित पवार गटाची मते भाजपला पडला नसल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला महायुतीमध्ये घेण्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी केली जात आहे.