
पंढरपूर तालुक्यात बोगस तणनाशकाचा हाहाकार; शेतकऱ्यांना मोठा फटका
तणनाशकाने फवारणी केली तरी गाजरगवतासारखे तण जळून जात नाही. तसेच या तणनाशकामुळे जमिनीचा पोतही खराब होत आहे. असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना सहन करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर गाजरगवतासह इतर तण वाढले आहे. या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची तणनाशके वापरतात. सध्या बाजारात विक्रीसाठी असलेल्या तणनाशकात अमोनियम सॉल्ट ऑफ ग्लायफोसेट नावाचा घटक जास्त प्रमाणात वापरण्यात येत असल्यानेच तण जळत नाहीत.
या पुड्यांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. जमिनी नापीक होण्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने या तणनाशकावर कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी केली आहे.
याबाबत कृषीतज्ज्ञ सूर्यकांत मोरे यांनी ग्लायफोसेट या तणनाशकावर मागील काही महिन्यात बंदी घातली होती. आता बाजारात तीन प्रकारची बोगस तणनाशके मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदीची बिले घ्यावीत, असा सल्ला यावेळी मोरे यांनी दिला.
शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या तणनाशकांच्या संशयास्पद पुड्यांबाबत खरेदीच्या बिलांसह लेखी तक्रार करावी. त्यानुसार पुड्यांवरील कंपन्यांची तपासणी केली जाईल. – सूर्यकांत मोरे, तालुका कृषी अधिकारी