'इथं' चक्क बोअरवेलमधून निघतंय उकळतं पाणी; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
यवतमाळ : सध्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे सगळीकडे पावसाचे पाणी दिसून येत आहे. मात्र, यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या इंदिरानगरच्या साई लक्ष्मीनगरात खोदलेल्या बोअरवेलमधून चक्क उकळलेले पाणी येत आहे. पावसाळ्यात बोअरवेलमधून उकळलेले पाणी येत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पाण्याची तपासणी करून उपाययोजना कराव्या, अशी मागणी घरमालक यांनी पुसद तहसीलदारांकडे केली आहे.
यवतमाळच्या इंदिरानगर येथील साई समर्थनगरीत घरमालक माणिक राठोड यांच्या प्लॉट क्रमांक 157 मध्ये सुमारे दोन वर्षांपूर्वी घरगुती पाणी वापरासाठी बोअरवेल खोदण्यात आली होती. त्या बोरवेलमध्ये आतापर्यंत सामान्य पाणी येत होते. पण पावसाळ्यात त्या बोअरवेलमधून उकळलेले पाणी येत आहे. तेच उकळलेले पाणी पिण्यासाठी व इतर कामासाठी वापरणे कठीण झाले आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पाण्याची चौकशी करून उपाययोजना करून द्यावी, अशी मागणी तहसीलदार जोरवर यांच्याकडे केली आहे.
हेदेखील वाचा : Pune News: एकीकडे 1300 टँकरने पाणीपुरवठा तर दुसरीकडे दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
जाणकाराच्या मते, जमिनीत कॅल्शियम व फॉस्फरसचे प्रमाण असल्यामुळेच पाणी उकळत असावे, असा अंदाज वर्तविला आहे. परंतु, तो चौकशीचा भाग बनला आहे. त्यामुळे तहसीलदार काय भूमिका घेणार, याकडे घरमालकासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ऐन पावसाळ्यात टँकरने होतोय पाणीपुरवठा
दुसरीकडे, पुण्यात मे आणि जून महिन्यामध्ये समाधानकारक पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटल्याचे चित्र दिसत आहे. असले तरी प्रत्यक्षात शहरात दररोज सरासरी 1300 टँकर फेऱ्या होत असल्याने महापालिकेचा नियमित पाणीपुरवठा अपुरा ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
पुण्यात अशुद्ध पाण्याचा पुरवठा
पुणे शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळांमधून गढूळ, कुजलेला आणि वास येणारे पाणी येत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठी वेगळ्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. ठाकूर बेकरी परिसर, संत नामदेव हायस्कूलजवळचा भाग आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठामागील परिसरात ही समस्या अधिक तीव्र असल्याचेही समोर आले आहे.