बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बहुजन समाज पक्षाचे नेते काळुराम चौधरी व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या या पक्षाच्या उमेदवार प्रियांका कोकरे यांनी बारामती शहरातील मार्केटयार्ड येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये बहुजन समाज पक्षाने सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत धनगर समाजातील युवती ॲड. प्रियांका कोकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोकरे यांची उमेदवारी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठी चर्चेत आहे. त्यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार, कोकरे या किती मते मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, यानंतर काळूराम चौधरी म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी उत्साहाने मतदान करावे. या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता प्रियंका कोकरे यांना चांगला प्रतिसाद देईल, असा विश्वास आहे. देशातील जनता महागाई ,भ्रष्टाचार, बेरोजगारी या प्रश्नावरून वैतागली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील नागरिकही दोन्ही पवारांमधील वादाला वैतागली आहे. त्यांना तिसरा पर्याय हवा आहे, तो तिसरा पर्याय आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.