लवाद वकील म्हणून कायदेशीर कारकीर्द घडवा
पुणे : लवादामध्ये भारतात आणि जागतिक स्तरावर कायदेशीर करिअरच्या सर्वोत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. सिव्हिल, क्रिमिनलसारख्या पारंपारिक कायदेशीर बाबींप्रमाणे लवादामध्ये करिअर निवडले पाहिजे, असे विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश डॉ. शालिनी फणसाळकर यांनी व्यक्त केले.
हिंद लॉ हाऊस प्रकाशनातर्फे लेखक आणि लवादाचे वकील अॅड. अमन विजय दत्ता लिखित ‘द हँडबुक ऑन डोमेस्टिक ऑर्बिटे्रशन इन इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन लॉ कॉलेज येथील प्राचार्य पंडित सभागृहात न्यायाधीश डॉ. शालिनी फणसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, ज्येष्ठ सॉलिसिटर आणि मध्यस्थ अमित हरियानी, मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील निखिल साखरदंडे, सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे माजी उपनिबंधक अॅड. गणेश चंद्रू व हिंद लॉ हाऊसचे रमेश सेठी उपस्थित होते.
न्या.डॉ. शालिनी फणसाळकर म्हणाल्या, “लवाद हा देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर कायदेशीर व्यवस्थेचा एक भाग बनला आहे. त्यामुळे पर्यायी विवाद निराकरणाच्या क्षेत्रातील कायदेशीर साहित्य आणि तज्ज्ञांची गरज आहे.”
सुनिल वेदपाठक म्हणाले, “हे पुस्तक लवादाच्या कायद्याचे सर्वसमावेशक विहंगावलोकन देते. सध्याच्या आणि भविष्यातील न्यायालयीन कामकाजातही ते मदत करेल.” तर अॅड. अमन विजय दत्ता म्हणाले,” भारतातील घरगुती लवादावर केंद्रित असणारे हे पहिले पुस्तक आहे. सुरूवातीपासून शेवटपर्यंत देशांतर्गत लवादावर नेव्हिगेट करण्यात व्यावसायिकांना मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.”
अॅड. अमित हरीआनी म्हणाले, “लवादाच्या दाव्यांचा पाठपुरावा करताना उद्भवणार्या व्यावहारिक समस्यांना कसे हाताळायचे यावरील हे पुस्तक आहे. यातील केस स्टडीज् अभ्यासकांना विवादांना समोरे जाणे सोपे करेल.”
अॅड. निखिल साखरदंडे आणि अॅड. गणेश चंद्रू यांनी आपल्या भाषणात पुस्तकाच्या अनोख्या स्वरूपाचे कौतुक केले आणि न्यायालयीन भार कमी करण्यासाठी लवादाबद्दल जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अधिवक्ता परवाझ काझी व रमेश सेठी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.