
देवळ्याजवळ बस उलटली; मोठा अनर्थ टळला
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. त्यातच आता देवळा येथे बस उलटून अपघात झाला. या अपघातात बसमधील ३६ प्रवाशांपैकी सहा प्रवासी अधिक जखमी झाले तर इतरांना प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दिली जात आहे.
विंचूर-प्रकाशा (७५२ जी) राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (दि. १४) भावडे फाट्याजवळ साक्री आगाराची बस (एमएच २० बीएल २६६१) पलटी झाली. या अपघातात बसमधील ३६ प्रवाशांपैकी सहा प्रवासी अधिक जखमी झाले. विशेष म्हणजे, रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन विहिरींपासून बस थोडी दूर थांबल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे म्हटले जात आहे. साक्री आगाराची नाशिक-नंदुरबार ही बस सटाण्याच्या दिशेने जात होती.
भावडबारी घाटाच्या पुढे महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे आणि तेथे कटर मशीनच्या साहाय्याने रस्त्याला चिरे पाडण्याचे काम चालू आहे. यामुळे या भागात एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र, तसे ठळक बॅरिकेट्स (सुरक्षा अडथळे) रस्त्यावर नसल्याने बसचालकाच्या ते लक्षात आले नाही.
चालकाने वेगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला अन्…
बसचा वेग अधिक असल्यामुळे पुढील मोठा अपघात टाळण्यासाठी चालकाने वेगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि मदतीसाठी धाव घेतली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी देवळा पोलिसांत मोटार अपघात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात एका कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये कारचालक असलेल्या ३० वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धनंजय कोळी यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी चिमुकल्या लेकराचं आगमन झालं होत. आता या तीन महिन्यांचा चिमुकल्याचा डोक्यावरून बापाचं छत्र कायमचं हरपलं आहे.
हेदेखील वाचा : Pune Accident: नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा गेला जीव, तीन महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन