पर्यटकांच्या बसला अपघात
येवला : येवला-भारम मार्गावरील डोंगरगावजवळ रस्त्याच्या एका बाजूने पायी जाणाऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात समोरील ट्रॅक्टरवर बस आदळून अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात बसचालकही जखमी झाला असून, त्याला येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : नाशिकमध्ये 200 फूट खोल दरीत कोसळून टँकरचा भीषण अपघात; 5 ठार, 4 गंभीर जखमी
येवला आगाराची येवला-राहडी बस (एमएच २० बीएल ०२३८) येवल्याहून भारमकडे जात असताना रस्त्याच्या एका बाजूला काही महिला पायी जात होत्या. तर समोरून ट्रॅक्टर येत असल्याने महिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात डोंगरगावजवळ वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर (एमएच २१- ४५३१) वर बस आदळली. त्यामुळे ट्रॅक्टरचालक हुसेन बहादुर पटेल, फिरोज मेहबूब पटेल व सलमान युसुफ पटेल (सर्व रा. तळवाडे) गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने खासगी वाहनाने येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, अपघातात बसमधील काही प्रवाशांनादेखील किरकोळ दुखापत झालेली आहे. घटनेची माहिती मिळताच येवला आगारप्रमुख प्रवीण हिरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयातही जखमींना भेट देऊन त्यांनी दिलासा दिला.
काही दिवसांपूर्वीही झाला अपघात
काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये अपघात झाला होता. त्यामध्ये दुधाचा टँकर 200 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून, 4 जण जखमी झाले होते. त्यानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नवीन कसारा घाटाजवळ हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली होती.
हेदेखील वाचा : धक्कादायक! लसणाच्या नावाखाली विकल्या जात आहेत सिमेंटच्या पाकळ्या; अकोल्यामधील घटना