लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! 'मराठी'ला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
मुंबई: समस्त मराठी माणसांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. कारण केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राची शान वाढली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा यासाठी गेली अनेक वर्षे मागणी करण्यात येत होती. मात्र केंद्र सरकारने आता याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषा सातासमुद्रांपार पोहोचण्यास आणखी वेग येणार आहे. आज पार पडलेल्या केंद्र सरकारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या बैठकीत केंद्र सरकारने मराठी भाषेसह अन्य पांच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठी, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. दरम्यान केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. ‘एक्स’ वर पोस्ट शेअर करत त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजचा हा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिन आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. ”
ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस.
अत्यंत अभिमानाचा क्षण !लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी…#मायमराठी #अभिजातमराठी pic.twitter.com/8seexSeliI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2024
”हा दिवस यावा यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला. अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. राज्यातील तमाम मराठी जनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो,” असे फडणवीस म्हणाले आहेत.