ठाणे, स्नेहा काकडे : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५” या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील ७७७ गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा वापर, तसेच ग्रामस्थांची बदललेली मानसिकता याबाबत केंद्र शासनाच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून या सार्वजनिक सुविधा प्रभावीपणे वापरून परिसराची स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमात ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत सहभाग घेत असते. यावर्षी केंद्र शासनाच्या त्रयस्थ पथकामार्फत ग्रामपंचायतींमध्ये उभारलेल्या स्वच्छता सुविधा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन केंद्रांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. या पाहणीमधून एकूण १००० गुणांच्या आधारे जिल्हा तसेच राज्याचे गुणांकन निश्चित केले जाईल.
पाहणी प्रक्रियेत प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन, खतखड्यांचे व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घरभेटी दरम्यान मिळणारी माहिती इत्यादींचा समावेश असेल. यामध्ये थेट निरीक्षणासाठी १२० गुण, ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी १०० गुण, गावातील सुविधांच्या वापराबाबत २४० गुण, तर प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित ५४० गुणांची प्रश्नावली असेल.
या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीत प्लास्टिक संकलन केंद्र, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन सुविधा कार्यरत आहे का, हे पाहिले जाणार आहे. यासोबतच उघड्यावर कचरा नसणे, सार्वजनिक शौचालयांचा वापर सुरू असणे, अंगणवाडी, शाळा, धार्मिक स्थळे, बाजार स्थळ आदी ठिकाणी परिसर स्वच्छ असणे, कचऱ्याचे वर्गीकरण केंद्राची उपलब्धता आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधा प्रभावी असणे यासंबंधी प्रत्यक्ष निरीक्षण होणार आहे.
गृहभेटीच्या दरम्यान घरातील वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा नियमित वापर, हात धुण्याच्या सवयी, ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण आणि त्या दृष्टीने सुविधा उपलब्ध आहेत का याचे परीक्षण होणार आहे. तसेच, या सर्व सुविधा भविष्यात बचत गट किंवा इतर संस्था यांच्या माध्यमातून सातत्याने चालू राहतील यासाठी ग्रामपंचायतींनी केलेल्या शाश्वत उपाययोजनाही गुणांकनासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपाणी पुरवठा समिती सदस्य यांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले.”स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५” हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी केले आहे.